मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 जानेवारी 2026
मुंबई, – फ्लॅटच्या सतरा लाख रुपयांचा अपहार करुन एका तरुणीची फसवणुक केल्याप्रकरणी एका प्रॉपटी एजंटला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. कन्हैय्यालाल भानुलाल जैन असे या एजंटचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत कृष्णा शांताराम नकाशे हा सहआरोपी असून या दोघांनी संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
आकांक्षा विश्वास हिवालकर ही 24 वर्षांची तरुणी खार परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. कृष्णा नकाशे हा तिच्या गावचा रहिवाशी असून ते एकमेकांच्या परिचित होते. तो खार परिसरात राहत असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. हिवालकर कुटुंबियांना एक फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, याबाबत त्यांनी कृष्णाकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांची ओळख कन्हैय्यालाल जैनशी करुन दिली होती. तो प्रॉपटी डिलर असून त्याच्याकडे विक्रीसाठी अनेक फ्लॅट आहेत. तो त्यांना स्वस्तात फ्लॅट देईल असे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी कन्हैय्यालालला फ्लॅट पाहण्यास सांगितले होते.
काही दिवसांनी त्याने त्यांना जोगेश्वरीतील एका निवासी अपार्टमेंटचा फ्लॅट दाखविला होता. फ्लॅटचे मूळ कागदपत्रे देऊन त्यांना फ्लॅट घेण्यास प्रवृत्त केले होते. काही अडचण आल्यास त्याच्या मालकीचा खार येथील नियर दादामिया चाळ, शांतीलाल कंपाऊंड, भाग्योदर रहिवाशी संघाचा फ्लॅट देतो असे सांगितले. त्यामुळे घरातील सर्व मंडळीशी चर्चा केल्यानंतर हिवालकर कुटुंबियांनी तो फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या फ्लॅटची किंमत 31 लाख रुपये होती. त्यापैकी सतरा लाख रुपये त्यांनी त्यांना आरटीजीएस स्वरुपात दिले होते. उर्वरित रक्कम फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर देण्याचे ठरले होते.
याच दरम्यान त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या घरी गेल्यानंतर ते घरी सापडत नव्हते. नंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. स्वस्तात फ्लॅटचे आमिष दाखवून या दोघांनी त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच आकांक्षा हिवालकर हिने निर्मलनगर पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कन्हैय्यालाल जैन आणि कृष्णा नकाशे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या कन्हैय्यालाल जैन याला पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्याने कृष्णा नकाशे याच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी फ्लॅटच्या आमिषाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.