फ्लॅटच्या सतरा लाखांचा अपहारप्रकरणी प्रॉपटी एजंटला अटक

गुन्हा दाखल होताच गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 मार्च 2026
मुंबई, – फ्लॅटच्या सुमारे सतरा लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्धाची फसवणुक केल्याप्रकरणी प्रॉपटी एजंट अरुण राजेंद्रन देवेंद्रन याला समतानगर पोलिसांनी अटक केली. अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच अरुण देवेंद्रन हा पळून गेला होता, अखेर दोन महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

प्रकाश जयसुखलाल भट हे कांदिवलीतील अशोकनगर, विजापूर सोसायटीमध्ये राहतात. ते एका खाजगी कंपनीत कामाला असून त्यांच्या वडिलांनी अरुण देवेंद्रन याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केी होती. ऑक्टोंबर 2025 रोजी त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या तक्रारीबाबत प्रकाश भट यांची समतानगर पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. प्रकाश भट हे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याने त्यांच्यासह त्यांच्या वडिलांनी स्वतच्या मालकीचा एक फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी प्रॉपटी एजंट अरुण देवेंद्रनशी फ्लॅटबाबात सविस्तर चर्चा केली होती.

फेब्रुवारी 2022 रोजी त्याने त्यांना कांदिवलीतील मोरारजी म्हाडा इमारत क्रमांक दोनमधील एक फ्लॅट दाखविला होता. त्याची किंमत वीस लाख रुपये इतकी होती. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांनी तोच फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला वीस लाखांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला होता. मात्र एक वर्ष उलटूनही त्याने म्हाडाचे अ‍ॅलोटमेंट आणि भाडा पावती दिली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित कागदपत्रांसाठी त्याच्याकडे सतत तगादा लावला होता. मात्र त्याने त्यांना कागदपत्रे दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यासोबतचा फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. त्याने त्यांना पैसे दिले नाही.

मात्र त्याच इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. यावेळी जयसुखलाल भट यांनी फ्लॅट त्यांच्या नावावर होईल का याबाबत विचारणा केली होती. त्यानेही त्यांना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फ्लॅट त्यांच्या नावावर करण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला दहा लाख ऑनलाईन तर सात लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. एक महिन्यांत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तो त्यांच्या नावावर फ्लॅट देणार होता. मात्र त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.

अरुण देवेंद्रनकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखलह होताच आरोपी पळून गेला होता. गेल्या दोन महिन्यांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी पळून गेलेल्या अरुण देवेंद्रन याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे फ्लॅट देण्याचा बहाणा करुन इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page