फ्लॅटच्या आमिषाने आर्टिस्ट महिलेची दोघांकडून फसवणुक
वॉण्टेड असलेल्या तोतया बिल्डरला चार महिन्यांनी अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 नोव्हेंबर 2025
मुंबई, – बिल्डर असल्याची बतावणी करुन नवीन इमारतीमध्ये फ्लॅट देतो असे सांगून एका आर्टिस्ट महिलेची साडेसोळा लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या बिल्डर भामट्याला चार महिन्यानंतर वर्सोवा पोलिसांनी अटक केली. बाबू आनंद सिंदाल असे या आरोपी भामट्याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत ब्रोकर मोहम्मद इक्बाल अजीमखान अहमद याचा सहभाग उघडकीस आल्याने त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जात असल्याने बाबू सिंदालची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
प्रियांका संजय साहू ही महिला तिच्या पतीसह दोन मुलांसोबत अंधेरीतील वर्सोवा-यारी रारेड परिसरात राहते. ती बॉलीवूडमध्ये आर्टिस्ट म्हणून कामाला आहे तर तिचे पती संजयकुमार साहू हे अॅक्टिंग शिकवण्याचे काम करतात. मोहम्मद इक्बाल हा तिच्या परिचित असून गेल्या आठ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. मे 2023 रोजी त्याने त्यांची बाबू सिंदालशी ओळख करुन दिली होती. त्याचा वर्सोवा गावात एक फ्लॅट आहे. त्याला त्याचा फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगितले होते. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांनी त्याचा पाच लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी त्याला पाच लाख ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते.
याच फ्लॅटमध्ये त्याचा मित्र राहत असून त्याला तो फ्लॅट भाड्याने दिल्यास त्यांना दरमाह चौदा हजार भाडे मिळतील असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या मित्राला भाडेकरु म्हणून ठेवले होते. याच दरम्यान इक्बालने बाबू हा व्यवसायाने बिल्डर असून तो वर्सोवा येथील मांडवी गल्लीत कल्पेश हाऊस नावाच्या एका इमारतीचे बांधकाम करत आहे. या इमारतीमध्ये त्यांना तेरा लाखांमध्ये 400 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी नवीन इमारतीमध्ये एक फ्लॅट बुक करताना त्यांना पाच लाख आणि नंतर साडेसहा लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचा सेल अग्रीमेंट झाले होते.
सप्टेंबर 2023 रोजी बाबूने त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याने सप्टेंबर महिन्यांत फ्लॅटचा ताबा दिला नाही. याच दरम्यान प्रियांका साहूला त्यांनी हेव्ही डिपॉझिटवर दिलेला फ्लॅटही आबू सिंदालच्या मालकीचा नसल्याचे समजले होते. हा प्रकार निदर्शनास येताच प्रियांकासह तिच्या पतीने त्यांच्याकडे हेव्ही डिपॉझिटसह नवीन इमारतीमध्ये फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी बाबूने त्यांना दोन धनादेश दिले होते, मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. वारंवार पैशांची मागणी करुनही त्यांनी तिला साडेसोळा लाख रुपये दिले नाही.
बाबू सिंदाल आणि मोहम्मद इक्बाल यांच्याकडून फ्लॅटच्या नावाने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बाबू सिंदाल आणि मोहम्मद इक्बाल या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या बाबू सिंदाल याला पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्याने मोहम्मद इक्बालच्या मदतीने पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.