फ्लॅटचा कागदपत्रांचा गैरवापर करुन बँकेतून कर्ज काढून फसवणुक
एकाच कुटुंबातील तिघांसह एजंटविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – फ्लॅट खरेदी-विक्रीचा करार करुन कर्जासाठी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन बॅकेतून सुमारे ६० लाख रुपयांचे कर्ज काढून एका महिलेसह खाजगी बँकेची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांसह एजंटविरुद्ध ओशिवरा पोलिसांी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सुबोध बन्सीलाल जाजू, सिद्धार्थ बन्सीलाल जाजू, अंजली जाजू आणि गुलफाम गोदीवाला अशी या चौघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आयशा अन्वर शेख (५४) ही महिला जोगेश्वरीतील ओशिवरा लिंक रोड, पाटीलपूत्र, ओशिवरा सहकारी सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट ४०३ मध्ये राहते. अकरा वर्षांपूर्वी तिने हा फ्लॅट विकत घेतला होता. याच दरम्यान कौटुंबिक वादानंतर तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. या फ्लॅटची तिला विक्री करायची होती, त्यामुळे तिने तिचा परिचित एजंट गुलफामला ही माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी गुलफाम हा सुबोध जाजूसोबत फ्लॅट पाहण्यासाठी आला होता. फ्लॅट पाहिल्यानंतर सुबोधने फ्लॅट खरेदीचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात एक कोटी पाच लाखांमध्ये फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला होता. डिसेंबर २०१७ साली त्यांच्यात एक करार झाला होता. त्यानंतर सुबोध आणि गुलफामच्या सांगण्यावरुन त्यांनी बँकेत एक संयुक्त बँक खाते उघडले होते. ९ जानेवारी २०१८ रोजी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करताना त्याने तिला १५ हजार रुपये कॅशने तर ५१ लाख ५४ हजार रुपयांचा एक धनादेश दिला होता. मात्र जोपर्यंत तो सांगत नाही तोवर धनादेश बँकेत टाकू नका असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने उर्वरित रक्कमेचे गृहकर्ज काढून व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
याच दरम्यान सुबोधने तिच्याकडून घराचे कागदपत्रे, ऍलोटमेंट लेटर, शेअर सर्टिफिकेटसह तिचे वैयक्तिक कागदपत्रे घेतले होते. ते कागदपत्रे त्याने तिला परत केले नाही. पंधरा दिवसांत उर्वरित पैसे देतो असे सांगून सुबोधने पैसे दिले नाही. त्यामुळे तिने त्याच्याकडे विचारणा करुन घरासह तिचे वैयक्तिक कागदपत्रे परत करण्यास सांगितले. मात्र त्याच्याकडून तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने वर्तमानपत्रात एक जाहिरात दिली होती. त्यात सुबोध जाजूसोबत तिचे घराच्या खरेदी-विक्रीबाबत करार झाला होता. मात्र पैशांवरुन त्यांच्यातील व्यवहार पूर्ण न झाल्याने हा करार रद्द झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने एक वर्ष उलटूनही पैसे दिले नाही किंवा कागदपत्रे परत केली नाही. जानेवारी २०२३ रोजी तिच्या घराला बँकेची एक नोटीस लावण्यात आली होती. त्यात सुबोध, सिद्धार्थ आणि अंजली जाजू यांनी तिच्या घरावर ६० लाख ४२ हजार रुपयांचे कर्ज घेतले असून या कर्जाचे नियमित हप्ते भरले नाही म्हणून घरावर लवकरच जप्ती येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.
या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने बोरिवलीतील गोराई परिसरात असलेल्या बँकेत जाऊन मॅनेजरशी भेट घेऊन सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बॅक मॅनेजरने या घरावर तिघांनी कर्ज घेतले होते, मात्र एक वर्ष उलटूनही त्यांनी कर्जाचे हप्ते भरले नाही, त्यामुळे ही नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यानंतर तिने घडलेला प्रकार बॅक मॅनेजरला सांगून घराचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झालाच नसल्याचे सांगितले. तिच्या घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन जाजूने गुलफामच्या मदतीने ही फसवणुक केली होती. त्यामुळे बँक मॅनेजरने तिला या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आश्वासन देऊन स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने ओशिवरा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुबोध जाजू, सिद्धार्थ जाजू, अंजली जाजू आणि गुलफाम गोदीवाला यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या चौघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. यातील सुबोध हा जोगेश्वरीतील मसाजवाडी तर सिद्धार्थ आणि अंजली हे बोरिवलीतील गोराई परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.