तीन वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅटच्या आमिषाने गंडा
६८ लाखांच्या फसवणुकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – तीन वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे ६८ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांधकाम क्षेत्राशी संबंधित एका खाजगी कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जयेश शहा, केतन शहा आणि गौरव शहा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही रवी गुुपचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आशिषकुमार सोमनाथ झा हे पवईतील हिरानंदानी परिसरात राहत असून शिक्षण क्षेत्रांशी संबंधित त्यांचा व्यवसाय आहे. तेरा वर्षांपूर्वी त्यांना एका नवीन फ्लॅटमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांना रवी ग्रुपकडून मिरारोड येथे एका गौरव ईडन या इमारतीचा प्रोजेक्ट सुरु असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी रवी ग्रुपच्या कांदिवलीतील कार्यालयात भेट दिली होती. यावेळी त्यांची जयेश शहा, केतन शहा आणि निमिश शहा यांच्याशी फ्लॅटविषयी चर्चा झाली होती. त्यांना त्यांच्या इमारतीमघ्ये नवव्या मजल्यावर एक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांना सुमारे तीस लाख रुपयांचे पेमेंट केले होते. काही दिवसांनी त्यांना इमारतीचे बांधकाम सुरु झाले नसून ती इमारत रवी ग्रुपची नसल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी या आरोपींनी त्यांना त्यांच्या गौरव समृद्धी या दुसर्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडून २०१३ ते २०१८ या कालावधीत आणखीन सुमारे २४ लाख रुपये घेतले होते.
२०१९ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर जयेश, केतन आणि गौरव यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांना त्यांच्या अन्य एका प्रोजेक्टमध्ये थ्री बीएचके फ्लॅट देतो असे सांगून त्यांच्याकडून आणखीन पैसे घेतले होते. अशा प्रकारे या तिघांनाही त्यांनी फ्लॅटसाठी ६८ लाख १० हजार रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅटचे आमिष दाखवून सुमारे ६८ लाखांचा अपहार करुन या तिघांनी त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी जयेश शहा, केतन शहा आणि गौरव शहा या तिघांविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.