पुर्नविकास इमारतीमध्ये फ्लॅटच्या आमिषाने ३० कोटींना गंडा
३६ रहिवाशांना फ्लॅट न देता २०८ फ्लॅटची विक्री करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पुर्नविकास इमारतीमध्ये ३८५ चौ. फुटाचे फ्लॅट देण्याचा करारनामा करुन दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता इमारतीमधील २०८ फ्लॅटची परस्पर विक्री करुन ३६ रहिवाशांची सुमारे तीस कोटीची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जी. ए बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पाच संचालकासह इतराविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुनहा दाखल करण्यात आला आहे. त्यात अनिलकुमार अग्रवाल, सारंगा अनिलकुमार अग्रवाल, अनुभव अनिलकुमार अग्रवाल, गोकुळ अनिलकुमार अग्रवाल व इतरांचा समावेश असून ते सर्वजण जी. ए बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड संचालक आहेत. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
सुनिल बाळकृष्ण चव्हाण (४५) हे मुलुंडच्या विद्यालय मार्ग, गरुड अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ए-१९ मध्ये राहतात. पूर्वी ते चेंबूरच्या म्हाडा कॉलनी, स्नेह सदन सहकारी सोसायटीमध्ये (इमारत क्रमांक२१) राहत असून तिथेच त्यांच्या मालकीचा एक फ्लॅट आहे. जून २००८ साली आरोपींनी त्यांच्या इमारतीच्या पुर्नविकासाचे काम हाती घेतले होते. या इमारतीमध्ये ३६ रहिवाशांना ३८५ चौ. फुटाचे फ्लॅट देण्यासह दरमहा भाडे, कॉर्पस फंड, फ्लॅटमध्ये चांगल्या सोयी-सुविधा आदी देण्याचे मान्य केले होते. यावेळी त्यांच्या कंपनीने सर्व रहिवाशांसोबत एक करार केला होता. या करारामध्ये आधी स्थानिक रहिवाशांना फ्लॅट देण्याचे तसेच नंतर सेलबेल फ्लॅट विक्रीची अट नमूद करण्यात आली होती. २०१८ साली आरोपीच्या कंपनीने ३६ रहिवाशांचे मासिक भाडे अचानक बंद केले होते. तसेच स्वतच्या आर्थिक फायद्यासाठी सुनिल चव्हाण यांच्या इमारतीच्या बाजूच्या इमारती खाली करुन त्या जमिनदोस्त केल्या. ती जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्याचे दाखवून त्याबदल्यातील जागेवर आरएनए कॉन्टीनेन्टल नावाच्या एका पंधरा इमारतीचे बांधकाम केले होते. २०१३ पर्यंत आरोपी संचालकांनी इमारतीच्या २०८ फ्लॅटची स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता परस्पर फ्लॅटची विक्री केली होती.
अशा प्रकारे अनिलकुमार अग्रवालसह इतर संचालकांनी स्थानिक रहिवाशांना बेघर करुन त्यांच्या जागेवर आलिशान इमारत बांधून, त्यांना भाडे न देता सुमारे तीस कोटीचा अपहार करुन फसवणुक केली. या प्रकारानंतर या रहिवाशांनी चेंबूर पोलीस ठाण्यात जी ए बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व संचालकासह इतर आरोपीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित कंपनीच्या सर्व संचालकासह इतर आरोपीविरुद्ध ४०९, ४२०, १२० बी, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच कंपनीच्या सर्व संचालकांची पोलिसाकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. अनिलकुमार अग्रवाल यांचे निधन झाल्याने त्यांच्या इतर संचालक मुलांविरुद्ध लवकरच कायदेशीर कारवाई होणार आहे.