बंगल्याच्या जागी इमारत बांधून ६.६४ कोटीची फसवणुक
तेरा फ्लॅटची विक्री करुन व्यावसायिकाची फसवणुकप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – दहिसर येथील बंगल्याच्या जागी अकरा मजल्याची बहुमजली इमारत बांधून पहिल्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील तेरा फ्लॅटची परस्पर विक्री करुन एका व्यावसायिकाची ६ कोटी ६४ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी साक्षी सौरभ दंत आणि सौरभ दंत या दोघांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही साक्षी डेव्हलपर्स कंपनीचे मुख्य संचालक आहेत. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
५८ वर्षांचे तक्रारदार प्रियेश रमेशचंद्र उपाध्याय हे व्यावसायिक असून ते डोबिवली परिसरात राहतात. पूर्वी ते दहिसर यसेथील जैन मंदिर, भिकाजी लाड रोडख्या उपाध्याय बंगला, सर्व्हे क्रमांक २६७/१/१, सीटीएस ८५७/८५७/१ मध्ये राहत होते. ४३५ चौ. मीटरची ही जागा असून त्यावर त्यांनी ३५.४ चौ. मीटरचा एक बंगला बांधला होता. ही प्रॉपटी त्यांचे वडिल रमेशचंद्र फुलेशंकर उपाध्याय यांच्या मालकीची होती. वडिलांच्या निधनानंतर ही प्रॉपटी त्यांच्यासह त्यांच्यासह आई, बहिण आणि भावाच्या नावावर झाली होती. त्यांचा बंगला जुना असल्याने त्यांनी ती जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती त्यांनी त्यांचे परिचित सौरभ दंत यांना सांगितली होती. ते स्वत एक बिल्डर असल्याने त्यांनी ती जागा स्वत विकसित करण्याची ऑफर देत त्यांना विविध आश्वासने देण्याचा प्रयत्न केला होता. तिथे एक बहुमजली इमारत बांधून त्यांना पहिल्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावर ३१४७ चौ. फुटाचे फ्लॅट, बांधकामाच्या वेळेस अतिरिक्त एफएसआय मिळाल्यास त्यांना ५० टक्के हिस्सा, ओपन व पोडियम कार पार्किंग देण्याचे आश्वासन दिले होते. बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्यांना एक लाखाची ठेव आणि दरमाह वीस ते तीस हजार टप्याटप्याने रुपये देण्याचे मान्य केले होते. सविस्तर चर्चेनंतर त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात सौरभ दंत यांच्या साक्षी डेव्हलपर्स कंपनीला बंगल्याचा ताबा देण्यात आला होता. काही महिने त्यांनी भाडे दिले, मात्र नंतर त्यांनी भाडे देणे बंद केले होते.
चौदा वर्षांनंतर सौरभने अकरा मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण केले होते. मात्र त्याने त्यांना त्यांच्या हिस्साच्या फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार तोंडी आणि पत्रव्यवहार करुनही त्याने प्रतिसाद दिला नाही. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी साक्षी आणि सौरभ यांनी एका खाजगी अर्थपुरवठा कंपनीकडून तीन कोटीचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मालकीचे सहाव्या मजल्यावरील फ्लॅट तारण ठेवले होते. त्यांच्या मालकीचे फ्लॅट तारण ठेवण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नव्हता. तरीही त्यांनी फ्लॅट तारण ठेवून त्यांच्या मालकीच्या तेरा फ्लॅटची अजय जयराम गुरव, निखील रमणलाल पंड्या, प्रदीप जयंतीलाल आचार्य, रामलाल भेराजी चौहाण, धर्मेश जे. शाह, प्रियांका राहुल रेडकर, सुरेश लक्ष्मीनारायण वर्मा, मंगेश भिकाजी शिंदे, सुदेशकुमार भगवानदास कपूर, ममता दिनेशकुमार जैन, रेश्मा जय कच्छी यांना परस्पर विक्री केली होती. या तेरा फ्लॅट खरेदी-विक्रीतून त्यांना ६ कोटी ६४ लाख रुपये मिळाले होते.
अशा प्रकारे प्रियेश उपाध्याय यांच्या मालकीच्या बंगल्यावर साक्षी आणि सौरभ दंत यांनी अकरा मजली इमारतीचे बांधकाम करुन त्यांच्या मालकीच्या तेरा फ्लॅटची परस्पर विक्री करुन ६ कोटी ६४ लाखांची फसवणुक केली होती. त्यांना विश्वासात न देता एका अर्थपुरवठा कंपनीकडून तीन कोटीचे कर्ज घेताना त्यांच्या मालकीचे फ्लॅट तारण ठेवले, करारानुसार त्यांना दरमाह भाडे दिले नाही तसेच दिलेल्या मुदतीत इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नव्हता. हा प्रकार लक्षात येताच प्रियेश उपाध्याय यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच साक्षी आणि सौरभ दंत यांच्याविरुद्ध ३१८ (४), ३१६ (२), (१), ३ (५) भारतीय न्यास सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे