गहाण ठेवलेल्या फ्लॅटची विक्री करुन ८५ लाखांची फसवणुक
फ्लॅटमालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बजाज हाऊसिंग फायनान्सकडे गहाण ठेवलेल्या फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका लेबर कॉन्ट्रक्टर व्यावसायिकाची सुमारे ८५ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्याम तुलसीदास हिंदोचा या फ्लॅटमालकाविरुद्ध अंधेरी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. श्याम हा गुजरातच्या द्वारका, देवभूमीचा रहिवाशी असून गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
हिमांशू हर्षद सोलंकी हे लेबर कॉन्ट्रक्टर असून अंधेरीतील तेलीगल्ली परिसरात राहतात. ऑक्टोंबर २०२३ रोजी त्यांचा मित्र मनोज सोलंकीने त्यांची तेजस ठक्करार व श्याम हिंदोचा यांच्याशी ओळख करुन दिली होती. यावेळी या मित्राने तेजस हा पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत वरिष्ठ अधिकारी असून पुण्यातील खरडी परिसरात त्याचा थ्री बीएचके फ्लॅट आहे. त्याचे डिसेंबर २०२३ रोजी लग्न ठरले असून त्याला पैशांची गरज आहे. त्यामुळे त्याला त्याच्या फ्लॅटची विक्री करायची आहे. या फ्लॅटची सध्या किंमत दिड कोटी रुपये असून तो त्याला एक कोटीमध्ये फ्लॅट देण्यास तयार आहे. त्यामुळे ऑक्टोंबर २०२३ रोजी हिमांशू सोलंकी हे त्यांच्या मित्रांसोबत पुण्यातील फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेले होते. फ्लॅट पसंद पडल्याने त्यांनी त्याच्याशी फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. श्याम हा त्याचा चांगला मित्र असून त्याची होणारी पत्नी डॉक्टर आहे, त्यामुळे त्यांनी बिनधास्त फ्लॅटचा व्यवहार करावा असे मनोज सोलंकीने सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला टप्याटप्याने फ्लॅटसाठी ८५ लाख ५० हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले होते.
रजिस्ट्रेशननंतर त्यांनी फ्लॅटच्या कागदपत्रांची मागणी केली होती, मात्र श्याम त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांनी त्याने त्याची पत्नी त्याला सोडून पळून गेल्याचे सांगितले. त्यामुळे तो मानसिक तणावात आहे. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांनी त्याला काही महिने कॉल केले नाही. त्यानंतर श्याम हा त्यांचे कॉल घेत नव्हता. कॉल करुनही त्याच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. या घटनेनंतर त्यांनी त्याच्या पुण्यातील घरी जाऊन पाहणी केली असता त्यांना श्याम हिंदोचा फ्लॅट खाली करुन नागपूपरच्या गोंदिया येथे निघून गेल्याचे समजले. २७ डिसेंबर २०२३ ते त्यांच्या फ्लॅटमध्ये होते, यावेळी तिथे बजाज हाऊसिंग फायनान्सचे काही कर्मचारी आले होते. त्यांनी श्यामबाबत विचारणा केली असता त्यांनी श्यामकडून त्यांनी हा फ्लॅट घेतले असून आता तेच या फ्लॅटचे मालक असल्याचे सांगितले. यावेळी या अधिकार्याने श्यामने फ्लॅटसाठी बजाज फायनान्स कंपनीकडून ९३ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड न केल्याने त्याच्या फ्लॅटवर जप्तीची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले.
ही माहिती ऐकून हिमांशू सोलंकी यांना धक्काच बसला होता. फ्लॅटवर ९३ लाखांचे कर्ज असताना, फ्लॅट बजाज फायानान्स कंपनीकडे गहाण असताना श्यामने त्यांच्याशी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांची ८५ लाख ५० हजाराची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात श्यामविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. श्याम हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. श्यामने पुण्यातील फ्लॅटचा तक्रारदारासोबत इतर कोणाशी खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक केली आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.