मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – दोन फ्लॅटसाठी दिलेल्या २ कोटी ३४ लाख रुपयांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जंबकुमार छगनलाल शेठ या विकासकाविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनिष जगदीश मेहता हे जुहू येथील रुईया पार्क परिसरात राहत असून व्यावसायाने व्यावसायिक आहेत. जंबकुमार शेठ हा विकासक असून त्याच्या मालकीची नूतन बिल्डर्स नावाची एक कंपनी आहे. या कंपनीकडून गोरेगाव येथील एस. व्ही रोडवर एक इमारतीचे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले होते. त्यांना फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे त्यांनी त्याच्या प्रोजेक्टमध्ये दोन फ्लॅट बुक करण्याचा निर्णय घेतला होता. याच संदर्भात दहा वर्षांपूर्वी त्यांनी जंबकुमार शेठची भेट घेतली होती. या भेटीत फ्लॅटसंदर्भात सविस्तर चर्चा केल्यांनतर त्यांनी संबंधित प्रोजेक्टमध्ये दोन फ्लॅट बुक केले होते. त्यानंतर त्यांना त्याच्याकडून अठराव्या मजल्यावर १८०१ आणि १८०२ क्रमांकाचे दोन फ्लॅट अलोट करण्यात आले होते. ऑक्टोंबर २०१४ ते एप्रिल २०२४ या कालावधीत या दोन्ही फ्लॅटसाठी त्यांनी त्याला टप्याटप्याने २ कोटी ३४ लाख रुपये दिले होते.
मात्र दहा वर्ष उलटूनही त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही. चौकशीनंतर जंबकुमार शेठने त्यांना अलोट केलेल्या दोन्ही फ्लॅटची परस्पर विक्री करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती, मात्र दिलेल्या त्याने पैसेही परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जंबकुमार शेठविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२० भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मनिष मेहता यांच्यासह इतर काही लोकांची जंबकुमारने फ्लॅटच्या नावाने फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.