बुक केलेल्या फ्लॅटऐवजी दुसरा फ्लॅट देऊन फसवणुक
सव्वाकोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बुक केलेल्या फ्लॅटऐवजी दुसरा फ्लॅट देऊन एका वयोवृद्धाची तिघांनी सुमारे सव्वाकोटीची फसवणुक केली. याप्रकरणी वनराई पोलिसांनी ब्रम्हदेव शुक्ला, ईश्वरदेव शुक्ला आणि सुरजदेव शुक्ला या तिघांविरुद्ध फसवुणकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी विकासक असून त्यांची डी. जी बिल्डर नावाची एक कंपनी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
६९ वर्षांचे तक्रारदार गोरेगाव परिसरात राहत असून ते सध्या निवृत्त आहेत. दहा वर्षांपूर्वी त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असतानाचच त्यांना गोरेगाव येथे डी. जी बिल्डर कंपनीच्या इमारतीच्या प्रोजेक्टची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी फ्लॅटबाबत चर्चा केली होती. या चर्चेनंतर त्यांनी त्यांच्याकडे १०१० चौ. फुटाचा टू बीएचकेचा एक फ्लॅट बुक केला होता. याच फ्लॅटसाठी त्यांनी तिन्ही आरोपींना संपूर्ण पेमेंट केले होते. मात्र या तिघांनी त्यांना बुक केलेल्या फ्लॅटऐवजी ४९५ चौ. फुटाचा वन बीएचकेच्या फ्लॅटचा ताबा दिला. त्यांच्यातील एमओयुमध्ये त्यांनी फ्लॅटचा ताबा देण्यास उशीर झाल्याचे कबुल देताना त्यांना मूळ रक्कमेसह भाड्यापोटी सुमारे सव्वाकोटी येणे बाकी आहे. वारंवार विचारणा करुनही त्यांनी ती रक्कम त्यांना परत केली. या रक्कमेचा परस्पर अपहार करुन या तिघांनी त्याचंी फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ब्रम्हदेव शुक्ला, ईश्वरदेव शुक्ला आणि सुरजदेव शुक्ला यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.