फ्लॅटच्या आमिषाने सतराजणांची बारा कोटींची फसवणुक
घाटकोपर येथील घटना; कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – घाटकोपर परिसरातील एका पुर्नविकास इमारतीमध्ये फ्लॅटच्या आमिषाने सतराजणांची सुमारे बारा कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांधकाम क्षेत्राशी संबंधित एका खाजगी कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध पंतनगर पोलिसांनी कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अजीत कस्तुरचंद जैन, नवीन मिस्त्रामल जैन अणि बिजय जयंतकुमार शाह अशी या तिघांची नावे असून ते सर्वज मिशाल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. या तिन्ही संचालकांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
जयेश भरत गाला हे व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत घाटकोपर परिसरात राहतात. त्यांचा गुड्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. बारा वर्षांपूर्वी घाटकोपरच्या पंतनगर, गणाधिराज सहकारी सोसायटीच्या सीटीएम क्रमंांक ५८६१ मध्ये एका पुर्नविकास इमारतीचे बांधकाम सुरु होते. या बांधकामाची माहिती मिळताच त्यांनी तिथे जाऊन इमारतीची पाहणी केली होती. यावेळी त्यांना ही इमारत मिशान कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बांधण्यात येत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीचे संचालक अजीत जैन, नवीन जैन आणि बिजल शाह यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्यासह त्यांची आई वासंती अणि पत्नी जिग्ना यांच्या संयुक्त नावाने एक फ्लॅट बुक केला होता. याच फ्लॅटसाठी त्यांनी तिन्ही संचालक असलेल्या कंपनीच्या बँक खात्यात २०११ ते २०१७ या कालावधीत टप्याटप्याने १ कोटी १५ लाख रुपयांचे पेमेंट केले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांच्या इमारतीचे प्रोजेक्ट पूर्ण केले नाही. २०२१ सालापर्यत इमारतीला नवव्या मजल्यापर्यंत परवानगी होती, तरीही त्यांनी इमारतीचे बांधकाम सातव्या मजल्यापर्यंत पूर्ण केले होते. उर्वरित बांधकाम थांबविले होते. या मजल्यासाठी त्यांनी इतर सोळा लोकांकडून ११ कोटी रुपये घेतले होते. अशा प्रकारे तक्रारदारासह इतर सोळाजणांना दिलेल्या मुदतीत फ्लॅट न देता फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. अनेकांनी त्यांच्याकडे फ्लॅटचा ताबा किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे करण्याची मागणी केली, मात्र त्यांनी कोणालाही परत केले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच जयेश गाला यांनी मिशान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या तिन्ही संचालकाविरुद्ध पंतनगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अजीत जैन, नवीन जैन आणि बिजय शाह या तिन्ही संचालकाविरुद्ध पोलिसंनी १२० बी, ४०९, ४२० भादवी सहकलम महाराष्ट्र मालकी प्लॉट अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या तिघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.