साडेचौदा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी फ्लॅटमालकाविरुद्ध गुन्हा
फ्लॅटसाठी घेतलेले पैसे व्यवसायात गुंतवून फसवणुक केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – साडेचौदा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोन फ्लॅट मालकाविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद उस्मान बैतुल्ला मणिहार आणि अबुबकर बैतुल्ला मणिहार अशी या दोघांची नावे असून या दोघांनी फ्लॅटसाठी घेतलेले पैसे त्यांच्या व्यवसायात गुंतवून तक्रारदारासह त्यांच्या भावांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.
फहाद मुसव्वीर शेख हे मालाडच्या मालवणीतील रहिवाशी असून फोर्ट परिसरात डिझायनिंगचे काम करतात. त्यांचे राहते घर लहान असल्याने त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही भावांनी एक नवीन फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. राहते घर विकून त्या पैशांतून त्यांना मोठा फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. नोव्हेबर २०२३ रोजी त्यांच्या एका मित्राने मालाड येथील मार्वे रोड, जनकल्याणनगर, अविराही हाईट्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली होती. हा फ्लॅट अबूबकर बैतुल्ला मणिहार आणि मोहम्मद उस्मान बैतुल्ला मणिहार यांच्या मालकीचा होता. त्यामुळे ते त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही भावांना फ्लॅट पाहून पसंद पडला होता. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. चर्चेअंती त्यांच्यात ७०० स्न्वेअर फुटाच्या या फ्लॅटची किंमत १ कोटी ३३ लाख ५० हजार इतकी किंमत ठरली होती. या फ्लॅटवर बँकेचे ८५ लाख रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे बँकेचे कर्ज त्यांच्या नावावर ट्रान्स्फर करुन उर्वरित तीस लाख रुपये चेक आणि साडेअठरा लाख रुपये कॅश स्वरुपात देण्याचे दोघांकडून मान्य करण्यात आले होते.
ठरल्याप्रमाणे फहाद शेख यांनी दोन्ही फ्लॅटमालकांना साडेचौदा लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे बँकेसह फ्लॅटच्या कागदपत्रांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी कागदपत्रे दिली नाही. करारानुसार त्यांना फेब्रुवारी २०२४ रोजी फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरले होते. मात्र त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याशी सुरु असलेला व्यवहार रद्द करुन फ्लॅटसाठी दिलेल्या साडेचौदा लाखांची मागणी सुरु केली होती. यावेळी या दोघांनी त्यांना त्यांच्या व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांनी ती रक्कम व्यवसायात गुंतविली आहे. पैसे येतील तेव्हा त्यांना त्यांचे पैसे देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी त्यांना एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दोन्ही आरोपीविरुद्ध मालवणी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मोहम्मद उस्मान आणि अबूबकर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.