मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जानेवारी २०२५
मुंबई, – स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने एका ५४ वर्षांच्या व्यक्तीची सुमारे ५९ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन भामट्यांना कुरार पोलिसांनी अटक केली. सुरज काळे ऊर्फ सुरज कमलेश्वर दुबे आणि धीरज गुलाब यादव अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ऑनलाईन फ्लॅटची जाहिरात करुन या टोळीने ही फसवणुक केली होती. तक्रारदारासह इतर लोकांची त्यांनी फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
जितेंद्र बाळकृष्ण डिचवलकर हे मिरारोडचे रहिवाशी असून ते एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांचे घर लहान पडत असल्याने ते मोठ्या घराचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांना एका सोशल साईटवर मालाड येथील कुरारगाव, वेस्टर्न हायवेजवळ एका इमारतीच्या बांधकामाची माहिती मिळाली होती. त्यात फ्लॅटची सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन फ्लॅटसाठी माहिती भरली होती. मे २०२४ रोजी त्यांना सुरज दुबे नावाच्या एका व्यक्तीने फो करुन ओमकार अल्टामॉन्टे या इमारतीमध्ये एक फ्लॅट उपलब्ध असून गुंतवणुकीसाठी हा फ्लॅट योग्य असल्याचे सांगितले. यावेळी त्याने फ्लॅटची किंमत ६० लाख रुपये सांगितले. फ्लॅट मालकाला पैशांची गरज आहे. त्यामुळे तो स्वस्तात फ्लॅट विक्रीसाठी काढत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जितेंद्र हे त्यांचा मुलगा प्रतिकसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना तिसर्या मजल्यावरील फ्लॅट दाखविण्यात आले होते.
प्रत्यक्षात हा फ्लॅट मोठा तसेच त्यांच्या कुटुंबासाठी योग्य होता. त्यामुळे त्यांनी तो फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. काही दिवसांनी त्यांनी त्यांना फ्लॅटसह रजिस्ट्रेशनसाठी टप्याटप्याने सुमारे ५९ लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाले होते. रजिस्ट्रेशनचे सर्व कागदपत्रे दिल्यानंतर त्यांना लवकरच फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही ते फ्लॅटचा ताबा देत नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी फ्लॅटचे कागदपत्रे त्यांच्या वकिलांना दिले होते. या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर फ्लॅटचे सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे वकिलांनी सांगितले.
या आरोपींनी स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून त्यांची सुमारे ५९ लाखांची फसवणुक केली होती. त्यांना कॉल केल्यानंतर सर्वांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीनंतर राजेश मलागे, सुरज दुबे, राज दुबे, सत्यम दुबे, धीरज यादव आणि इतर पाच अज्ञात व्यक्ती अशा अकराजणांविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी सुरज काळे ऊर्फ सुरज दुबे आणि धीरज यादव या दोघांना अटक केली. अटकेनंतर या दोघांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारात फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे.