कर्ज घेतलेल्या फ्लॅटची विक्री करुन वयोवृद्धाची फसवणुक
२.५५ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जानेवारी २०२४
मुंबई, – एका खाजगी बँकेतून फ्लॅटवर घेतल्याची माहिती लपवून फ्लॅटचा खरेदी-विक्री करुन एका वयोवृद्धाची २ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फ्लॅट मालकासह तिघांविरुद्ध चेंबूर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सुधीर मसंद, रश्मी मसंद आणि सचिन आसवानी अशी या तिघांची नावे असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
६४ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार करुवाकाट श्रीवत्सन हे चेंबूर येथील महेश कुटीर सोसायटीच्या दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०१ मध्ये राहतात. गुंतवणुक म्हणून त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. याच दरम्यान त्यांची सचिन आसवानीशी ओळख झाली होती. त्याने त्यांना सुधीर मसंद आणि रश्मी मसंद यांच्या मालकीचा फ्लॅट असल्याचे सांगून त्यांना तोच फ्लॅट खरेदी करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्याने त्यांची ओळख सुधीर मसंद आणि रश्मी मसंद याच्याशी करुन दिली होती. चर्चेदरम्यान त्यांच्यात २ कोटी ५५ लाखांना फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यानंतर त्यांनी या दोघांनाही टप्याटप्याने सप्टेंबर २०२१ ते मे २०२४ या कालावधीत २ कोटी ५५ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांनी फ्लॅटचा ताबा करुवाकाट यांना दिला होता.
काही दिवसांनी त्यांना सुधीर मसंद आणि रश्मी मसंद यांनी फ्लॅटवर एका खाजगी बँकेतून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न करता त्यांनी फ्लॅटची परस्पर करुवाकाट यांना विक्री करुन फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी तिन्ही आरोपीशी संपर्क साधून याबाबत विचारणा सुरु केली होती. मात्र त्यांच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी चेंबूर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुधीर, रश्मी आणि सचिन आसवानी यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जणार आहे.