बुक केलेल्या फ्लॅटची विक्री करुन २.१९ कोटीची फसवणुक
बिल्डर असलेल्या पिता-पूत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ जानेवारी २०२५
मुंबई, – आठ वर्षापूर्वी बोरिवलीतील रोमा सदन या पुर्नविकास सोसायटीमघ्ये बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तींना विक्री करुन एका महिलेसह दोघांची २ कोटी १९ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिल्डर असलेल्या अशोक जेठवा आणि मिहीर अशोक जेठवा या पिता-पूत्राविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हितेश कांतीलाल शाह हे बोरिवली परिसरात राहत असून एका चष्माच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात. २०१६ साली त्यांच्याच सोसायटीच्या समोर रोमा सदन या इमारतीचे पुनविकासाचे काम सुरु झाले होते. ते काम सोसायटीने जेठवा पिता-पूत्राच्या त्रिवेणी डेव्हल्पर्सला दिले होते. हितेश व त्यांची मेहुणी डॉ. भाविनी प्रशांत कामदार हिला नवीन फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यामुळे त्यांनी जेठवा यांची त्यांच्या बोरिवलीतील कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्या पुर्नविकासाच्या रोमा सदन या अपार्टमेंटच्या अकराव्या मजल्यावर भाविनीने तर बाराव्या मजल्यावर हितेश यांनी प्रत्येकी एक फ्लॅट बुक केला होता. ६८२ चौ. फुटाच्या या फ्लॅटची किंमत १.४१ कोटी रुपये इतकी होती.
ठरल्याप्रमाणे त्यांनी कॅश आणि चेक स्वरुपात त्यांना २ कोटी १९ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर १६ जून २०१८ रोजी हितेश यांना फ्लॅट क्रमांक १२०१ तर भाविनीला फ्लॅट क्रमांक ११०१ चे अलोटमेंट देण्यात आले होते. काही दिवसांनी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्याचे ठरले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नाही. विविध कारण सांगून ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्यासोबतचा फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही. याच दरम्यान त्यांना त्यांच्यासह त्यांच्या मेहुणीने बुक केलेल्या दोन्ही फ्लॅटची अशोक आणि मिहीर जेठवा यांनी परस्पर दुसर्या व्यक्तींना विक्री केल्याचे समजले होते. हा प्रकार समजताच त्यांना धक्काच बसला होता.
जेठवा पिता-पूत्राने फेब्रुवारी २०१६ ते फेबुवारी २०२४ या कालावधीत दोन फ्लॅटसाठी २ कोटी १९ लाख रुपये घेऊन, बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तींना विक्री करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच हितेश शाह आणि भाविनी कामदार यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानतर अशोक आणि मिहीर जेठवा यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक तसेच महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसाकडून तपास सुरु आहे. या दोघांची लवकरच पोलिसांकडून चोकशी होणार आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांकडून फ्लॅटसाठी पैसे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.