दहा फ्लॅटसाठी एकाच कुटुंबातील तिघांची ५.६५ कोटीची फसवणुक
कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सात पार्टनरविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – दहा फ्लॅटसाठी ५ कोटी ६५ लाख रुपयाचा अपहार करुन एकाच कुटुंबातील तिघांची फसवणुक झाल्याचा प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन खाजगी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या सात पार्टनरविरुद्ध माहीम पोलिसांनी भादवीसह महाराष्ट्र मालकी हक्क अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलचंद रांका, जुगराज रांका, रमेश रांका, जवलबेन अहबर, पद्माबेन आशर, इंदू अनिल आशर, सुरेश रांका अशी या सातजणांची नावे असून ते सर्वजण मोरपोरिया ऍण्ड रांका कन्स्ट्रक्शन कंपनीचे आणि सदर कंपनीचे पार्टनर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सातजणांवर बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर इतर व्यक्तींना विक्री करुन तक्रारदारासह तिघांची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
८५ वर्षांची वयोवृद्ध महिला भंवरीदेवी फतेहचंद भन्साली ही तिचा वयोवृद्ध मुलगा चेनरुप याच्यासोबत ताडदेवच्या आरती अपार्टमेंटमध्ये राहते. तिचे पती फतेहचंद भन्सारी यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. १९९५ साली भन्साली कुटुंबिय त्यांच्यासाठी नवीन फ्लॅटच्या शोधात होते. याच दरम्यान त्यांची रांका कन्स्ट्रक्शन कंपनीचे पार्टनर जुगराज रांका, रमेश रांका, सुरेश रांका आणि जवलबेन अहबर, पद्माबेन आशर आणि इंदू अनिल आशर यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी या आरोपींनी त्यांच्या कंपनीकडून माहीम येथे अरिहंत टॉवर्स नावाच्या एका नवीन इमारतीच्या कंन्स्ट्रक्शनचे काम सुरु आहे. ही इमारत समुद्रकिनारी असून भविष्यात या इमारतीच्या फ्लॅटचे प्रचंड वाढणार आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करावी अशी विनंती केली होती. त्यामुळे भंवरीदेवी व तिचे पती फतेहचंद भन्सारी, मुलगी संगीता जैन या तिघांनी त्यांच्या अरिहंत टॉवर्स इमारतीमध्ये ८३२९ चौ. फुटाचे दहा फ्लॅट बुक केले होते. या फ्लॅटसाठी त्यांनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात ५ कोटी ६५ लाख रुपये जमा केले होते. पेमेंटनंतर त्यांच्यात दहा फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. तीन वर्षांत फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगून कंपनीने इमारतीच्या बांधकामासाठी दहा वर्ष घेतली होती. २००३ साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आणि काही लोकांना फ्लॅटचे अलोटमेंट लेटर देण्यात आले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही संंबंधित आरोपींनी त्यांच्या दहा फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे रजिस्ट्रर अग्रीमेंट करुन दिले नव्हते.
याच दरम्यान त्यांनी त्यांच्यासोबतचा करार रद्द न करता त्यांच्या मालकीच्या फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून दहाही फ्लॅटच्या इतर व्यक्तींना परस्पर विक्री केली होती. त्यातील काही फ्लॅट त्यांनी हिंदुजा हॉस्पिटलला भाडेतत्त्वावर दिले होते. त्यांच्यासोबत तसा करार करुन २००६ पासून त्यांच्याकडून भाडे घेतले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी फ्लॅटसाठी दिलेल्या ५ कोटी ६५ लाखांची मागणी सुरु केली, मात्र आरोपींनी त्यांना पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी माहीम पोलीस ठाणयत मोरपोरिया ऍण्ड रांका कन्स्ट्रक्शन आणि सदर कंपनीच्या पार्टनरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर कंपनीच्या सातही पार्टनरविरुद्ध ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी सहकलम महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियिम ३, ४, ५ कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या सातही पार्टनरची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.