फ्लॅटसाठी घेतलेल्या 26 लाखांचा अपहार करुन फसवणुक
रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – फ्लॅटसााठी घेतलेल्या सुमारे 26 लाखांचा अपहार करुन एका रिक्षाचालकाची पती-पत्नीने फसवणुक केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाच्या तक्रारीवरुन आरोपी पती-पत्नीविरुद्ध मालवणी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अमजदअली अन्वरअली सौदागर आणि आफशा अमजदअली सौदागर अशी या दोघांची नावे आहेत. फ्लॅटचा विक्रीचा सौदा झाला असताना अमजदअलीने त्याची पत्नी आफशा हिच्या नावावर गिफ्ट डिड करुन फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
रमेश दामू सरोदे हे रिक्षाचालक असून मालाडच्या मार्वे रोड, खारोडी परिसरात राहतात. पूर्वी सरोदे कुटुंबिय मालवणी परिसरात राहत होते. तिथेच अमजदअली राहत होता, त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली होती. ऑक्टोंबर 2022 रोजी त्याने त्यांना मालाडच्या मार्वे रोडवर खारोडी, मार्वे वीन सहकारी सोसायटीमध्ये त्याच्या मालकीचा एक फ्लॅट असून तो फ्लॅट त्यांना मार्केटपेक्षा कमी किंमतीत विक्री करतो असे सांगितले होते. त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबियांसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. फ्लॅट पसंद पडल्याने त्यांनी तो फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, यावेळी त्यांच्यात फ्लॅटचा सौदा 26 लाखांमध्ये झाला होता. या फ्लॅटवर त्यांनी गृहकर्ज घेतले होते. ते कर्ज फेडल्यानंतर उर्वरित रक्कम त्यांना देण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे त्यांनी कर्जाची रक्कम, सोसायटी मेन्टेनन्ससह 26 लाखांचे पेमेंट केले होते. मात्र फ्लॅटच्या रजिस्ट्रेशन करण्याबाबत तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. विचारणा केल्यानंतर त्याने त्यांच्याकडे चार लाखांची मागणी केली होती. मात्र त्यांनी ती रक्कम देण्यास नकार दिला होता. नोव्हेंबर 2022 रोजी अमजदअलीने त्याच्या पत्नीच्या नावाने तोच फ्लॅट गिफ्ट डिड म्हणून निबंधक कार्यालयात नोंद केली होती. अशा प्रकारे फ्लॅटचा खरेदी-विक्री करुनही त्याने त्याच्या पत्नीच्या नावाने गिफ्ट डिट रजिस्ट्रेशन करुन, फ्लॅटचा ताबा न देता किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच रमेश सरोदे यांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमजदअली सौदागर आणि आफशा सौदागर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी पती-पत्नीची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.