रोड कटिंगमध्ये गेलेले फ्लॅट स्वस्तात देण्याच्या आमिषाने फसवणुक
दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2025
मुंबई, – रोड कटिंगमध्ये गेलेले फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका टेलर व्यक्तीची फसवणुक करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. रामसंजीवन सुभेदार गुप्ता असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच रामसंजीवन हा पळून गेला होता, अखेर दहा महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या अटकेने अशाच फसवणुकीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
58 वर्षांचे तक्रारदार मन्नू गुरुसीद्दप्पा वारद हे कांदिवलीतील लोखंडवाला परिसरात राहत असून ते टेलर म्हणून काम करतात. अकरा वर्षांपूर्वी त्यांची रामसंजीवनशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्यांना तो प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन (पीएपी) कोट्यातून गरजू लोकांना फ्लॅट देण्याचे काम करतो. या कोट्यातील फ्लॅट 225 चौ. फुटाचे असून कांदिवलीतील आकुर्ली रोडवर एक फ्लॅट उपलब्ध आहे. हा फ्लॅट अजय बैरागीचरण मोहंती याच्या मालकीची असून त्याला साडेबारा लाखांमध्ये फ्लॅटची विक्री करायची आहे. त्यामुळे त्यानी तो फ्लॅट खरेदी करावा, भविष्यात त्याला फ्लॅटमधून चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलांशी चर्चा केल्यानंतर तो फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी अजय मोहंती यांच्या फ्लॅटच्या कागदपत्रांची पाहणी केली असता त्याचा फ्लॅट खरोखरच रोड कटिंगमध्ये गेल्याने त्याला एक फ्लॅट मिळणार असल्याचे दिसून आले होते.
याच दरम्यान त्यांनी रामसंजीवनशी भेट घेऊन तो फ्लॅट घेण्यास इच्छुक असल्याचे सांगून त्याला मे ते डिसेंबर 2015 या कालावधीत चेकद्वारे सात लाख तर मे 2015 ते डिसेंबर 2018 या कालावधीत कॅश स्वरुपात सहा लाख सत्तर हजार रुपये असे एकूण तेरा लाख सत्तर हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. चौकशीअंती तो फ्लॅट दुसर्याच व्यक्तीला अलोट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी रामसंजीवनकडे विचारणा केल्यानंतर त्याने त्यांना म्हाडा रोड क्रमांक तीनमध्ये फ्लॅट मिळणार असल्याचे सांगितले. मात्र त्याने दुसर्या फ्लॅटचाही ताबा दिला नाही. रामसंजीवनकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी फ्लॅटचा विचार सोडून दिला आणि त्याच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने त्याला पैसे दिले नाही. उलट त्यांनाच शिवीगाळ करुन धमकाविले. नंतर तो त्यांना भेटत नव्हता किंवा त्यांचे कॉलला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे त्यांनी रामसंजीवनविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना गेल्या दहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या रामसंजीवल गुप्ता याला दोन दिवसांपूर्वी समतानगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रामसंजीवनने अशाच प्रकारे फ्लॅटच्या आमिषाने इतर काही गुन्हे केले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.