तारण ठेवलेल्या फ्लॅटची विक्री करुन दोन कोटीची फसवणुक
एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 एप्रिल 2025
मुंबई, – बँकेत तारण ठेवेलल्या फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका 65 वर्षांच्या वयोृद्ध महिलेची चौघांनी सुमारे दोन कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध पंतनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. निमेश नटवरलाल मेहता, मनिषा निमेश मेहता, गुलाबराय सोळंखी आणि योगेश नटवरलाल मेहता अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांची लवकरच पोलिसाकडून चौकशी होणार असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहेत.
जयालक्ष्मी निलकंठण ही वयोवृद्ध महिला कांजूरमार्ग, लोढा ऑरम सोसायटीच्या एलिटिस अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्यासह तिचे पती एका नामांकित बँकेत नोकरी करत होते. सध्या ते दोघेही निवृत्त झाले आहेत. त्यांचा गारोडियानगर परिसरात राहायचे होते, त्यामुळे त्यांना स्वतचा फ्लॅट विक्री करुन नवीन टू बिएचके फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. आठ वर्षांपूर्वी एका एजंटच्या माध्यमातून त्यांची निमेश मेहताशी ओळख झाली होती. मेहता कुटुंबियांच्या मालकीचा घाटकोपर येथील गारोडियानगर, निलकंठ सोसायटीमध्ये एक फ्लॅट होता. या फ्लॅटची मेहता कुटुंबियांना विक्री करायची होती. त्यामुळे तिने फ्लॅटची पाहणी केली होती. तिच्यासह तिच्या पतीला फ्लॅट पसंद पडला होता. त्यामुळे त्यांनी तो फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता.
चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा दोन कोटी सात लाखांमध्ये सौदा झाला होता. यावेळी मेहता कुटुंबियांनी फ्लॅटवर कुठलेही कर्ज नसल्याचे तसेच टायटल क्लिअर असल्याची बतावणी केली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने त्यांना 1 कोटी 81 लाख धनादेश तर 26 लाख लाख कॅश स्वरुपात दिले होते. रजिस्ट्रेशननंतर त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरले होते. या दरम्यान त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटचे मूळ कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी मूळ कागदपत्रे दिली नाही. ऑगस्ट 2020 रोजी बँकेचा एक प्रतिनिधी तिथे आला होता. त्याने त्यांना 2013 साली मेहता यांनी याच फ्लॅटवर कर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी फ्लॅट बँकेत तारण म्हणून ठेवले होते. या कर्जाची परतफेड न केल्याने फ्लॅटवर जप्तीची कारवाई सुरु असल्याचे सांगितले.
ही माहिती ऐकून जयालक्ष्मी हिला धक्काच बसला होता. बँकेत तारण ठेवलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन मेहता कुटुंबियांनी तिच्याकडून फ्लॅटसाठी दोन कोटी सात लाख रुपये घेतले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने पंतनगर पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्याप्रकरणी मेहता कुटुंबियांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मेहता कुटुंबियांमुळे जयालक्ष्मीने तिच्या फ्लॅटची विक्री करुन त्यांना पेमेंट केले होते. आता बँकेने त्याच फ्लॅटवर जप्तीची कारवाई केल्याने तक्रारदार वयोवृद्धाला तिच्या पतीसोबत भाड्याच्या रुममध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोषीवर कारवाई करण्याचे आदेश पंतनगर पोलिसांना दिले आहेत.