फ्लॅटसाठी घेतलेल्या 1.36 कोटीचा अपहार करुन फसवणुक
वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन दोन बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या 1 कोटी 36 लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध महिलेची दोन बिल्डरांनी फसवणुक केल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जितेंद्र मेहता आणि चंद्रहास मेहता या दोन्ही बिल्डरांविरुद्ध माटुंगा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. इमारतीला आठव्या मजल्याची परवानगी नसताना या दोघांनी तक्रारदार महिलेला आठव्या मजल्यावर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मुरिंथाथेरी रामकृष्णा अय्यर मीना ही 94 वर्षांची महिला तिच्या वयोवृद्ध पुतण्यासोबत दादरच्या हिंदू कॉलनीत राहते. तिची मुलगी गीता रामकृष्णा ही सध्या अमेरिकेत राहत असून तिथेच नोकरी करते. 2016 साली तिला फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. नवीन फ्लॅटसाठी तिचे प्रयत्न ुसरु होते. यावेळी तिची प्रकाश कणकिया यांच्या मदतीने जितेंद्र मेहताशी ओळख झाली होती. यावेळी जितेंद्र मेहताने त्याची स्वतची बांधकाम क्षेत्राशी संबंधित एक कंपनी असून या कंपनीकडून दादर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे सांगितले.
याच इमारतीमध्ये त्यांना तीन कोटी पाच लाखांमध्ये 758 स्केअर फिट कारपेट एरिया असलेला आठव्या मजल्यावर फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात फ्लॅटसाठी आगाऊ रक्कम 1 कोटी 31 लाख रुपये आधी तर 1 कोटी 74 लाख रुपये फ्लॅटचा ताबा घेताना देण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर तिने तिच्या मुलीच्या बँक खात्यातून त्याला टप्याटप्याने एक कोटी छत्तीस लाख रुपयांचे पेमेंट केले होते. करारात नमूद केल्याप्रमाणे तिला इमारतीमध्ये आठव्या मजल्यावर फ्लॅट देण्याचे ठरले होते, मात्र महानगरपालिकेकडून त्यांनी आठव्या मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची परवानगी घेतली नव्हती.
ही माहिती समजताच तिने कंपनीचे संचालक जितेंद्र आणि चंद्रहास मेहता यांच्याकडे विचारणा ली होती. यावेळी या दोघांनी सीसी प्राप्त होताच इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल होते. ऑक्टोंबर 2018 रोजी त्यांना महानगरपालिकेकडून वाढीव बांधकामाचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. त्यानंतर या दोघांनी त्यांना आठव्या मजल्याऐवजी सातव्या मजल्यावर फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. मात्र गेल्या नऊ वर्षांत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. काही महिन्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबतचा करार रद्द केला होता. यावेळी त्याने त्यांना दहा लाखांचा धनादेश दिला होता, मात्र हा धनादश बँकेत न वटता परत आला होता.
अशा प्रकारे जितेंद्र आणि चंद्रहास मेहता यांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फ्लॅटचा ताबा न देता तक्रारदार वयोवृद्ध महिलेची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच मुरिंथाथेरी मीना हिने माटुंगा पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जितेंद्र आणि चंद्रहास मेहता या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही फ्लॅटधारकांची फ्लॅटसाठी पैसे घेऊन फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.