मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 एपिल 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटवर घेतलेल्या फ्लॅटची विक्री करुन तीन कोटीचा अपहार करुन एका तरुणाची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या वॉण्टेड आरोपीस दिड वर्षांनी आंबोली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद आसिफ अब्दुल अजीज मेमन असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत इरफान अहमद शकील अहमद पटेल, ओबेद सलीम मर्चंट, अमीर अफजल खांडवाला, नदीम अहमद कासमानी, शकील अली मोहम्मद बावरा, नईमसह इतर आरोपींचा समावेश होता. यापूर्वी याच गुन्ह्यांत सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मोहम्मद आसिफ या गुन्ह्यांत अटक झालेला सातवा आरोपी असून गुन्हा घडल्यानंतर तो पळून गेला होता.
मोहम्मद इलियास बुरानुद्दीन शेख हा 23 वर्षांचातरुण जोगेश्वरीतील बांदिवली हिल रोड, व्हिजन हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याला जोगेश्वरी परिसरात एक फ्लॅट घ्यायचा होता. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. तीन वर्षांपूर्वी त्याची संबंधित आठ आरोपींशी ओळख झाली होती. त्यांचा जोगेश्वरीतील एस. व्ही रोड, साबरी मशिदीजवळील गाळा क्रमांक चारमध्ये एक कार्यालय होते. तिथे त्यांच्यात फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी त्यांनी त्याला दोन फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. त्यातील एका फ्लॅटमध्ये त्याला त्याच्या कुटुंबियासोबत राहण्यास तर तर दुसरा फ्लॅट त्याला जास्त किंमतीत विक्री करुन फायदा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्याने त्यांच्याकडून दोन फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
याच दरम्यान या आरोपींनी हेव्ही डिपॉझिटवर एक फ्लॅट घेतले होते. याच फ्लॅटवर खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे कागदपत्रे बनवून घेतले होते. ते कागदपत्रे त्याला देऊन त्याने त्याच्याकडून सुमारे तीन कोटी रुपये घेतले होते. काही महिन्यानंतर त्याला तो फ्लॅट आरोपींनी हेव्ही डिपॉझिटवर घेऊन त्याला त्याच फ्लॅटची विक्री करुन त्याची फसवणुक केल्याचे समजले होते. 1 ऑक्टोंबर 2022 ते 30 जून 2023 या कालावधीत याच फ्लॅटसाठी मोहम्मद इलियासने त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडून पैसे घेतले होते. फ्लॅटसाठी तीन कोटी रुपये आरोपींना दिले, मात्र त्यांनी त्याची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र या आरोपींनी त्याला पैसे न देता त्याला पैशांची मागणी करतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली होती.
हा प्रकार उघडकीस येताच मोहम्मद इलियासने संबंधित सर्व आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र गुन्हा दाखल होताच मोहम्मद आसिफ हा पळून गेला होता. गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु होता. अखेर त्याला पालघर येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.