मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
मुंबई, – अंधेरीतील विरा देसाई रोडवरील मेट्रो प्रकल्पात गेलेल्या पात्र फ्लॅटचे बोगस कागदपत्रे देऊन फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका व्यक्तीची एकाच कुटुंबातील तिघांनी सोळा लाखांची फसवणुक केली होती, याच गुन्ह्यांत गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद लालबाबू मोहम्मद गफुर अली मंसुरी असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत नौशाद लालबाबू मोहम्मद मंसुरी आणि निलोफर मंसुरी हे दोघेजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेश्मा संजय त्रिवेदी ही महिला गोरेगाव येथे राहत असून ती एमएमआरडीएचे रुम नावावर ट्रान्स्फर करणे, फ्लॅट भाड्याने देणे तसेच फ्लॅट खरेदी-विक्रीचे काम करते. तिचे पतीही तिच्यासोबत एमएमआरडीए येथील कार्यालयात लायझिंग व ब्रोकर म्हणून काम करतात. गेल्या पंधरा वर्षांपासून या व्यवसायात त्यांची अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत. मे 2022 तिची सुरज किरण मंडलशी ओळख झाली होती. त्याला गोरेगाव, राममंदिर येथे एमएमआरडीएचा एक फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यासाठी फ्लॅटची पाहणी करताना तिला तिच्या परिचित नौशाद मंसुरी आणि मोहम्मद लालबाबू भेटले होते. ते दोघेही तिचे क्लायंट असून दहा वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. तिने त्यांना गोरेगाव येथील राममंदिर, सिग्मा इमारतीमध्ये एक फ्लॅट मिळवून दिला होता. त्यामुळे तिने त्यांच्याकडे फ्लॅटबाबत विचारणा केली होती. यावेळी मोहम्मद लालबाबूने त्यांची सून निलोफर मंसुरी हिचा एक फ्लॅट असल्याचे सांगितले.
याच फ्लॅटच्या बोलणीसाठी त्यांच्यात एक मिटींग झाली होती. त्यात रेश्मासह नौशाद, मोहम्मद लालबाबू, सुरज मंडल, त्याचा भाऊ प्रकाश मंडल आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी निलोफरचे मालकी हक्काचे एक घर अंधेरीतील विरा देसाई रोड, मेट्रो प्रकल्पात येत असून तोच फ्लॅट तिच्या नावावर 22 लाखांमध्ये करण्याचे आश्वासन दिले होते. फ्लॅटसाठी पार्ट पेमेंट केलनंतर त्यांच्यात एक करार झाला हेता. काही दिवसांनी त्यांनी फ्लॅटचे कागदपत्रे दिली होती. मात्र त्यात खाडाखोड असल्याचे दिसून आले होते, यावेळी त्यांनी उडवाडवीचे उत्तर देऊन विषय बदलण्याचा प्रयत्न केला होता. 27 जुलै 2022 रोजी ते सर्वजण वांद्रे येथील एमएमआरडीए कार्यालयात फ्लॅट सुरज मंडल याच्या नावाने ट्रान्स्फर करण्यासाठी आले होते.
काही दिवस फ्लॅटबाबत तिथे सुनावणी सुरु होती. त्यानंतर नौशाद आणि मोहम्मद लालबाबू यांनी त्यांना फ्लॅटचे पात्र आदेशाची कॉपीसह बोगस लाईट बिल आणि इतर कागदपत्रे दिले होते. याच दरम्यान त्यांनी सुरज मंडलकडून फ्लॅटसाठी सोळा लाख रुपये घेतले होते. मात्र फ्लॅटचा ताबा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्याचे आश्वासन पाळले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच रेश्मा त्रिवेदीने त्यांनी दिलेल्या सर्व कागदपत्रांची शहानिशा केली असता ते सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले. नौशाद लालबाबू, मोहम्मद लालबाबू यांनी त्यांची सून निलोफरच्या मदतीने बोगस लाईट बिल, भुताळे साहेबांची खोटी स्वाक्षरी असलेल्या पात्र आदेशाची कॉपी देऊन फ्लॅटचा व्यवहार केला, याच फ्लॅटसाठी सोळा लाख रुपये घेऊन सुरज मंडलची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच रेश्मा त्रिवेदी यांनी संबंधित तिघांविरुद्ध गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिन्ही आरोपीविरुद्घ पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मोहम्मद लालबाबू याला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत नौशाद लालबाबू मंसुरी आणि निलोफर मंसुरी हे दोघेही सहआरोपी असून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.