बँकेत तारण ठेवलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन फसवणुक
वयोवृद्धाला जोडप्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 मे 2025
मुंबई, – बँकेत तारण ठेवलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन एका वयोवृद्धाची सुमारे 95 लाखांची त्यांच्याच परिचित जोडप्याने फसवणुक केल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. निखत निजामुद्दीन शेख आणि निजामुद्दीन शेख अशी या जोडप्याची नावे असून कर्जाचे हप्ते न भरल्याने कोर्टाच्या आदेशावरुन बँकेने फ्लॅट जप्तीची कारवाई करुनही या जोडप्याने हेव्ही डिपॉझिटची रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्यांना चौकशीसाठी समन्स बजाविले जाणार असून चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
64 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार दयासिंग खेमसिंग अरोरा हे सायन-कोळीवाड्यातील समृद्धी सोसायटीमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांना दोन्ही मुले खाजगी कंपनीत कामाला असून त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. दोन वर्षांपूर्वी त्यांची निजामुद्दीनशी ओळख झाली होती. त्यावेळेस त्यांना भाड्याने एका फ्लॅटची गरज होती. यावेळी निजामुद्दीने त्याची पत्नी निखत हिच्या नावावर वडाळा येथील लोधा न्यू कफ परेड, टॉवर क्रमांक पाचमध्ये 40 व्या मजल्यावर एक फ्लॅट असल्याचे सांगितले होते. तो फ्लॅट त्यांना हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यचा प्रयत्न केला होता. फ्लॅटची पाहणी केल्यांनतर दयासिंग यांनी तो फ्लॅट भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्यात 95 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर तीन वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने देण्याचे ठरले होते.
17 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत त्यांनी निखतच्या बँक खात्यात 50 तर निजामुद्दीनच्या बँक खात्यात 45 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. करारानंतर 23 ऑक्टोंबर 2023 अरोरा कुटुंबिय संबंधित फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर दयासिंग यांना याच फ्लॅटवर निजामुद्दीनने त्याच्या आयवरी ब्रॅण्डच्या शूज व्यवसायासाठी एका खाजगी बँकेतून सुमारे अडीच कोटीचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे नियमित हप्ते ते भरत नव्हते. त्यामुळे बँकेने त्यांच्या फ्लॅटवर जप्तीची नोटीस बजाविली होती. याच प्रकरणात बँकेने लोकल कोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना लोकल कोर्टाने बँकेला फ्लॅट जप्तीचे आदेश दिले होते. हा प्रकार बँक अधिकार्याकडून समजताच त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी निजामुद्दीन व निखत यांच्याकडे त्यांच्या हेव्ही डिपॉझिटची मागणी सुरु केली होती.
मात्र त्यांनी ही रक्कम परत देण्यास स्पष्टपणे नकार देत त्यांचे मोबाईल बंद ठेवले होते. या दोघांनी बँकेत तारण ठेवलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन त्यांची सुमारे 95 लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच दयासिंग अरोरा यांनी वडाळा टी टी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फ्लॅटचे मालक नियत शेख व तिचे पती निजामुद्दीन शेख यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसाकडून सांगितले.