रजिस्ट्रेशन केलेल्या फ्लॅटची दोन वेळेस खरेदी-विक्री
पार्टनर बिल्डरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 जून 2025
मुंबई, – रजिस्ट्रेशन केलेल्या फ्लॅटची दोन वेळेस खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका योगा शिक्षिका महिलेची दोन पार्टनर बिल्डरने सुमारे 38 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. तेरा वर्ष पैशांची मागणी करुनही या दोघांकडून तिच्या पैशांची होऊ शकली नाही, त्यामुळे या शिक्षिकेच्या तक्रारीवरुन दोन्ही बिल्डरविरुद्ध कांदिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जयेश शहा आणि गौरव शहा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही रवि डेव्हलपर्स कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अलका जयकिशन हरजानी ही 55 वर्षांची महिला अंधेरीतील वर्सोवा-यारी रोडवर राहत असून ती योगा शिक्षिका आहे. 2012 रोजी तिला फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे तिने तिच्या परिचित डॉ. शरद मदनलाल शेठ यांच्याकडे विचारपूस केली होती. यावेळी त्यांनी तिला मिरारोड येथील गौरव वॅली फैज-दोन या इमारतीच्या बांधकाम साईटची माहिती दिली होती. ही इमारत गौरव शहा आणि जयेश शहा यांच्या मालकीची होती. त्यामुळे तिने दोघांची त्यांच्याच कांदिवलीतील कार्यालयात भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तिला इमारतीची माहिती सांगून तिला त्याच इमारतीमध्ये सोळाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1602/बी देण्याचे आश्वासन दिले होते.
याच फ्लॅटसाठी तिने त्यांना टप्याटप्याने 38 लाख रुपये दिले होते. या पेमेंटनंतर त्यांनी तिच्यासोबत फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले होते. एक महिन्यांत तिला फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. चौकशीनंतर या दोघांनी तिला दहाव्या मजल्यावरील बांधकाम मनपाने तोडले असून तिला सहाव्या मजल्यावर फ्लॅट देण्याचे मान्य केले होते. मात्र त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. याच दरम्यान तिला गौरव आणि जयेशने तिच्या फ्लॅटची मेवालाल यादव या व्यक्तीला विक्री करुन त्याच्यासोबत फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केल्याचे समजले होते.
हा प्रकार लक्षात येताच तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र त्यांनी तिला पैसे दिले नाही. गेल्या तेरा वर्षांपासून ते दोघेही तिला सतत टोलवाटोलवी करत होते. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयेश शहा आणि गौरव शहा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.