मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – बोरिवलीतील एका पुर्नविकास इमारतीमध्ये फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे 94 लाखांच्या अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विकासक असलेल्या पिता-पूत्राविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मिहीर अशोक जेठवा आणि अशोक अरविंद जेठवा अशी या दोघांची नावे असून या गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
तेजस उमाशंकर पंड्या हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. त्यांचा कॅटरर्सचा व्यवसाय असून त्यातून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. 2016 साली त्यांना त्रिवेदी डेव्हल्पर्सचे संचालक व मालक मिहीर जेठवा आणि अशोक जेठवा यांच्याविषयी माहिती मिळाल होती. त्यांच्या कंपनीमार्फत बोरिवलीतील शिंपोली रोड, दळवीनगरमधील शिंपोली दर्शन सहकारी सोसायटीच्या पुर्नविकास इमारतीचे काम सुरु होणार होता. त्रिवेदी झेस्ट या नवीन तयार होणार्या इमारतीमध्ये त्यांनी एक फ्लॅट बुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी जेठवा पिता-पूत्रांची भेट घेऊन त्यांच्याशी फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा केली होती.
यावेळी त्यांनी त्यांना त्रिवेदी झेस्ट इमारतीमध्ये पंधराव्या मजल्यावर 744 चौ. फुटाचा एक फ्लॅट पार्किंगसह पावणेदोन कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. चर्चेत ठरल्याप्रमाणे त्यांनी फ्लॅटसाठी जेठवा यांच्या कंपनीच्या नावाने 94 लाख 69 हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांना फ्लॅटचे अलॉटमेंट लेटर देण्यात आले होते. काही वर्षांनी त्यांना ही इमारत जेठवा पिता-पूत्रांनी रिषभ राज डेव्हलपर्सचे मालक हरिष जैन यांना पुर्नविकासासाठी दिल्याचे समजले. त्यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले होते. मात्र त्यांनी बुकींग केलेल्या फ्लॅटचा ताबा दिला नाही. याबाबत त्यांनी जेठवा यांच्याकडे विचारणा केली, मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती.
मात्र सात वर्षांत फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मिहर जेठवा आणि अरविंद जेठवा यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक, महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोन्ही पिता-पूत्रांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर पुढील कारवाई ठरविली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.