प्रोजेक्ट अर्धवट सोडून तीन फ्लॅटच्या पावणेदोन कोटीचा अपहार
त्रिवेणी डेव्हलपर्सच्या दोन विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जुलै 2025
मुंबई, – प्रोजेक्ट अर्धवट सोडून इमारतीचे बांधकाम पूर्ण करता तीन फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे पावणेदोन कोटीचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी त्रिवेणी डेव्हलपर्सच्या दोन विकासकाविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक अरविंद जेठवा आणि मिहीर अशोक जेठवा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतरांकडून फ्लॅटसाठी पैसे घेऊन दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे.
निरज धनश्याम जगवानी हे खार परिसरात राहत असून त्यांचा फळांचा व्यवसाय आहे. सात वर्षांपूर्वी त्रिवेणी डेव्हलपर्सचे मालक अशोक जेठवा आणि मिहीर जेठवा यांनी बोरिवली परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. याच इमारतीची पाहणी केल्यानंतर त्यांनी तिथे फ्लॅट बुक करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी जेठवा यांची भेट घेऊन फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेनंतर त्यांनी या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर 1301, 1302, 1303 क्रमाकांचे तीन फ्लॅट बुक केले होते. या फ्लॅटसाठी त्यांनी त्यांच्या त्रिवेणी डेव्हलपर्स कंपनीच्या बँक खात्यात 1 कोटी 74 लाख 89 हजार 910 रुपये ट्रान्स्फर केले होते.
या पेमेंटनंतर त्यांना तिन्ही फ्लॅटचे अॅलोटमेंटसह इतर दस्तावेज देण्यात आले होते. त्यात तीन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन फ्लॅटचा ताबा देण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र जेठवा यांनी तीन वर्षांत त्यांच्या इमारतीचे प्रोजेक्ट पूर्ण केले नाही. इमारतीचे बांधकाम अर्धवट सोडले होते. अशा प्रकारे त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बोरिवलीतील लोकल कोर्टात एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली होती.
यावेळी कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याचे आदेश कस्तुरबा मार्ग पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर निरज जगवानी यांची जबानी नोंदवून पोलिसांनी अशोक जेठवा आणि मिहीर जेठवा यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुक, महाराष्ट्र मालकी फ्लॅट विक्री व्यवस्थापन आणि हस्तांतरण प्रचाराचे नियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोन्ही विकासकाची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.