विक्री केलेल्या फ्लॅटची पुर्नविक्री करुन दिड कोटीची फसवणुक
बोरिवलीतील दोन बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 जुलै 2025
मुंबई, – विक्री केलेल्या फ्लॅटची दुसर्या व्यक्तीला पुर्नविक्री करुन सुमारे दिड कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन बिल्डरविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भूपेंद्र प्रेमशंकर जानी आणि योगेश प्रविणचंद्र भट अशी या दोघांची नरावे असून ते दोघेही विनायक डेव्हलपर्सचे भागीदार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे या दोघांनी एकाच फ्लॅटसाठी दोघांना बॅकेतून गृहकर्जासाठी एनओसी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
संदीप राजेंद्रप्रसाद मिश्रा हे गोरेगाव येथे त्यांच्या कुटु्रंबियांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. पाच वर्षांपूर्वी विनायक डेव्हलपर्सचे पार्टनर भूपेंद्र जानी आणि योगेश भट यांनी अंधेरीतील मरोळ परिसरात जेसिका सहकारी सोसायटीच्या इमारतीचे प्रोजेक्ट सुरु केले होते. या प्रोजेक्टची माहिती मिळताच संदीप मिश्रा यांनी घटनास्थळी जाऊन इमारतीची पाहणी केली होती. या पाहणीनंतर त्यांनी तिथे एक फ्लॅट बुक करण्याचा निर्णय घेतला होता. याच संदर्भात त्यांची भूपेंद्र जानी आणि योगेश भट यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी या दोघांनी त्यांना जेसिका सोसायटीमध्ये बी/405 फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
याच फ्लॅटसाठी त्यांनी एका बँकेतून गृहकर्ज घेतले होते. बुकींगसह गृहकर्जाची एकूण 1 कोटी 44 लाख 50 हजार रुपयांचे पेमेंट त्यांनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. या पेमेंटनंतर वर्षा अग्रवाल आणि पंचम अग्रवाल यांच्या नावाने अॅलोटमेंट लेटर दिले होते. 2022 साली या दोघांनी बांधकामाचा नवीन प्लॅन मंजूर करुन त्यात अग्रवाल यांचा बी/405 बदलून बी/402 दाखविला होता. हाच फ्लॅट त्याने फैयाज गनी सय्यद आणि मरियम अब्दुल गनी सय्यद यांना विक्री केला होता. या फ्लॅटसाठी त्याने त्यांना गृहकर्जासाठी एनओसी दिले होते. या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा आधीच व्यवहार झाला असताना, फ्लॅटवर बँकेचे गृहकर्ज असताना भूपेंद्र जानी आणि योगेश भट यांनी अग्रवाल कुटुंबियांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच अग्रवाल यांच्या वतीने संदीप मिश्रा यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर विनायक डेव्हलपर्सचे भागीदार भूपेंद्र जानी आणि योगेश भट या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोन्ही आरोपी भागीदारांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.