बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन 81 लाखांची फसवणुक
दोन्ही बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – अंधेरीतील एका इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन एका वयोवृद्ध विकासकाची सुमारे 81 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. फ्लॅटचा ताबा किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत न करता फसवणुक केल्याप्रकरणी दोन बिल्डरविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरेश तुराखिया आणि करण तुराखिया अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सागर डेव्हलपर्सचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
81 वर्षांचे तक्रारदार मालाड परिसरात राहत असून व्यवसायाने बांधकाम विकासक आहेत. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी तुराखिया यांच्या अंधेरीतील आयटुस इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये एक फ्लॅट बुक केला होता. या फ्लॅटसाठी त्यांनी त्यांना 2014 ते 2017 या कालावधीत 1 कोटी 31 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या पेमेंटनंतर त्यांना आयटुस इमारतीच्या ए विंगमधील फ्लॅट क्रमांक 1102 फ्लॅट अलोट करण्यात आले होते. या फ्लॅटबाबत त्यांच्यासोबत कायदेशीर करार करण्यात आला होता. दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा मिळाला नाहीतर त्यांना 21 टक्के व्याजदराने पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र तुराखिया यांनी या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी सुरेश आणि करण तुराखिया यांनी त्यांना 50 लाख रुपये परत केले होते. मात्र उर्वरित 81 लाख रुपये व्याजासहीत परत केले नाही. या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी दोन्ही आरोपी बिल्डरविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यांतर सुरेश आणि करण तुराखिया या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची पोलिसांकडून चौकफशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या दोघांनी अशाच प्रकारे इतर फ्लॅटचा व्यवहार करुन इतरांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.