फ्लॅटच्या आमिषाने गंडा घालणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एकाच फ्लॅटसाठी आठजणांकडून 1 कोटी 47 लाख 75 हजार घेतले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 सप्टेंबर 2025
मुंबई, – म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देतो असे आमिष दाखवून गंडा घालणार्‍या एका त्रिकुटाविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तुषार साटम ऊर्फ राजू, किरण बोडके आणि अशोक इंगोले अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनी एकाच फ्लॅटसाठी तक्रारदार महिलेसह आठजणांकडून 1 कोटी 47 लाख 75 हजार रुपये घेऊन फ्लॅट न देता त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या तिघांनी या आठजणांसह इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

कनिका विद्याधर खोत ही महिला मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात राहत असून एका खाजगी ट्रॅव्हेल्स एजन्सीमध्ये कामाला होती. तिला एक फ्लॅट विकत घ्यायचे होते. याच दरम्यान तिला काहीजणांना म्हाडामध्ये लॉटरीमध्ये घर मिळाले आहे, मात्र काही कारणास्तव ते घर घेत नाही. अशा फ्लॅटची राजू साटम हा स्वस्तात विक्री करत असल्याची माहिती तिला समजली होती. त्यामुळे तिने राजूशी भेट घेण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी ती मनसे कार्यालयात राजूला भेटण्यसाठी आली होती. तिथे तिची राजूसह अशोक इंगोले आणि किरण बोडके यांची भेट झाली होती. या तिघांनी ते तिघेही पार्टनर असून त्यांनी अनेकांना म्हाडाचे फ्लॅट स्वस्तात मिळून दिल्याचे सांगिेगले.

तिचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी तिला गोरेगाव येथील पहाडी, इ विंगमधील 708 क्रमांकाचा एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट अक्षय चव्हाण याचा असून त्याला तो फ्लॅट 47 लाखांमध्ये विक्री करायचा आहे असे सांगितले. यावेळी तिने अक्षयबाबत विचारणा केली असता त्यांनी तिला अग्रीमेंटदरम्यान अक्षय हा हजर राहतील असे सांगून फ्लॅटचे पेमेंट किरण बोडके याच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने मार्च ते ऑगस्ट 2024 या कालावधीत 34 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान त्यांच्यात एक एमओयू झाला होता. काही दिवसांनी तिने फ्लॅटच्या ताबा तसेच इतर दस्तावेजाबाबत विचारणा केली होती, यावेळी त्यांनी तिला अक्षय चव्हाणचे नातेवाईक मिलिटरीमध्ये आहे. त्यांना फ्लॅटचे तांबडे पत्र येणे बाकी आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल असे सांगून आणखीन पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे तिने त्यांना आणखीन दोन लाख रुपये दिले.

मात्र ते फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्यांच्याविषयी चौकशी सुरु केली होती. यावेळी तिला या तिघांनी तिच्यासह इतर काही लोकांशी फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे समजले. त्यात जनार्दन दामोदर देवरुखकर यांच्याकडून 11 लाख, राजाराम कलियामूर्ती व्हनिअर यांच्याकडून 20 लाख, अनंता महादेव खांडेकर यांच्याकडून 29 लाख 75 हजार, अविनाश प्रभाकर मोरे यांयाकडून 5 लाख, योगेश मारुती शिंदे यांच्याकडून 32 लाख, तुषार यशवंत साटमम यांच्याकडून 12 लाख 50 हजार आणि पूर्वा जितेंद्र पेम हिच्याकडून 2 लाख 25 हजार तसेच कनिकाकडून 34 लाख असे एकूण 1 कोटी 46 लाख 75 हजार रुपये घेतले होते. मात्र त्यापैकी कोणालाही फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे दस्तावेज दिले नव्हते.

म्हाडाचा स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून या तिघांनी कनिका खोतसह इतर सातजणांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने तिन्ही आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तुषार साटम, किरण बोडके आणि अशोक इंगोले यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page