फ्लॅटच्या 18 लाखांचा अपहारप्रकरणी मुख्य आरोपीस अटक
इतर दोन सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष मोहीम
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 सप्टेंबर 2025
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे अठरा लाखांचा अपहार करुन एका टेलरची फसवणुक केल्याप्रकरणी सुनिल नंदा यादव या मुख्य आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत राज आणि समीर नावाच्या दोन आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध सुरु केला आहे. प्रत्यक्षात स्वतच्या मालकीचा फ्लॅट नसताना या तिघांनी फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत सुनिल यादव हा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनोज दलसुख साचला हे बोरिवलीतील गोराई परिसरात राहतात. कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ ते टेलर म्हणून काम करतात. त्यांचा वडिलोपार्जित कांदिवलीतील वसनजी लालजी रोड जेठवानगरात एक फ्लॅट आहे. या फ्लॅटच्या वाटणीवरुन त्यांच्या कुटुंबियांमध्ये वाद सुरु होता. त्यामुळे त्यांनी तो फ्लॅट विक्रीचा निर्णय घेतला होता. या फ्लॅटच्या विक्रीतून त्यांना वीस लाख रुपये आले होते. तेव्हापासून तो त्याच्या बहिणीकडे राहत होता. याच पैशांतून त्याला स्वतसाठी एक फ्लॅट विकत घ्यायचा होता.
एका खाजगी वेबसाईटवर फ्लॅटची माहिती घेताना त्याला विरार येथील सन हाईट्समध्ये त्यांच्या बजेटमध्ये फ्लॅट असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संबंधित जाहिरातीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी राज नावाच्या एका व्यक्तीने कॉल घेऊन त्यांना सुनिल यादव याच्या मालकीचा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी राजसह सुनिल यादव आणि समीर या तिघांची भेट घेतली होती. फ्लॅटबाबत सविस्तर चर्चा केल्यांनतर त्यांच्यात वीस लाखांमध्ये सौदा पक्का झाला होता.
मार्च 2023 रोजी विरारच्या सन हाईट्स अपार्टमेंटच्या फ्लॅटची पाहणी केल्यांनतर त्यांनी त्यांना टप्याटप्याने अठरा लाख रुपये दिले होते. करारानंतर फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केल्यांनतर त्यांना फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र वारंवार विचारणा करुनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे कागदपत्रे दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी सन हाईट्सच्या कार्यालयात जाऊन फ्लॅटबाबत विचारणा केली होती.
यावेळी त्यांना तिथे सुनिल यादवचा कुठलाही फ्लॅट नसल्याचे समजले. सन हाईट्सच्या दहाव्या मजल्यावरील 1011 क्रमांकाचा फ्लॅट स्वस्तात देतो असे सांगून या तिघांनी त्यांची सुमारे 18 लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांत सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सुनिल यादवसह राज आणि समीर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच ते तिघेही पळून गेले होते. या तिघांचा शोध सुरु असताना तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सुनिल यादवला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.