हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक

1.64 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – हाऊसिंग प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 1 कोटी 64 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शैलेश प्रेमशंकर रावल या विकासकाविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दोन फ्लॅटसाठी पैसे घेऊन एक वर्षांनी दोन्ही फ्लॅट विकत घेऊन चांगला परतावा देतो असे सांगून शैलेशने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अल्हाद हेमंत आचरेकर हे त्यांच्या पत्नी व मुलीसोबत विलेपार्ले येथे राहत असून पुण्यातील एका खाजगी कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहेत.2009 साली त्यांनी ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात 60 लाखांमध्ये एक फ्लॅट घेतला होता. याच फ्लॅटची 2021 साली त्यांनी 98 लाखांना विक्री केली होती. त्याच वर्षी त्यांच्या सासूचे निधन झाले होते. त्यामुळे तिच्या सांताक्रुज येथील फ्लॅटची विक्री केली होती. त्यांच्या पत्नीला चार बहिणी असल्याने त्यांच्यात फ्लॅटच्या रक्कमेची समान वाटणी करण्यात आली होती. या फ्लॅट विक्रीतून त्यांच्या पत्नीला 50 लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची असल्याने ते अंधैरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरी परिसरात एक फ्लॅट पाहत होते.

याच दरम्यान त्यांच्या पत्नीच्या परिचित हर्षित तासकर यांनी त्यांना त्याने गोरेगाव येथील प्रेमलिला हाऊसिंग सोसायटीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्याची माहिती दिली होती. हा प्रोजेक्ट चांगला असून लवकरच प्रोजेक्ट पूर्ण होऊन रहिवाशांना फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे ते स्वतला गोरेगाव येथील प्रोजेक्टच्या साईटला भेट देण्यासाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना इमारतीचे बांधकाम जलद गतीने सुरु असल्याचे तसेच आठ मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झाल्याचे दिसून आले. हा प्रोजेक्ट आवडल्याने तसेच स्वत हर्षित यांनी तिथे गुंतवणुक केली होती, त्यामुळे त्यांनी तिथेच एक फ्लॅट खरेदीचा निर्णय घेतला होता.

या प्रोजेक्टचे मालक शैलेश रावल यांची भेट घेतली होती. त्यांच्यात फ्लॅटबाबत सविस्तर चर्चा झाली होती. यावेळी शैलेश रावलने त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना पाचव्या मजल्यावर दोन फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी 502 आणि 503 क्रमांकाचे18 हजार चौ.फुटाचे दोन फ्लॅट बुक केले होते. शैलेश रावलने त्यांना 1 कोटी 65 लाख 57 हजार 400 रुपये गुंतवणुक केल्यास दोन्ही फ्लॅट देण्याचे तसेच एक वर्षांनी त्यांनी तेच दोन्ही फ्लॅट त्यांना विक्री केल्यास त्यांना 2 कोटी 10 लाख 28 हजार 800 रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यातून त्यांना सुमारे 46 लाखांचा फायदा होणार होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात अल्हाद आचेकर शैलेश रावलच्या प्रोजेक्टमध्ये दोन फ्लॅटसाठी गुंतवणुक करणार, एक वर्षांनी तेच फ्लॅट शैलेश रावल त्यांच्याकडून खरेदी करतील. त्यांनी तसे न केल्यास ते अल्हाद आचरेकर यांना अठरा टक्क्याप्रमाणे पैसे परत करतील असे नमूद केले होते. या कराराची रजिस्ट्रेशन करुन नोटरी करण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी शैलेशला 1 कोटी 64 लाख 57 हजार 400 रुपयांचे पेमेंट केले होते. एक वर्षांनी त्यांनी गुंतवणुकीसह परताव्याची रक्कमेची मागणी सुरु केली होती.

यावेळी त्यांना शैलेशने त्याचा पार्टनर वेलजी पटेलशी वाद झाल्याने त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला ाही. लवकरच त्यांना त्यांची मूळ रक्कम परताव्यासह मिळेल असे सांगितले. मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. फ्लॅटचे अ‍ॅलोटमेंट लेटर न देता त्यांनी गुंतवणुक केलेल्या दोन्ही फ्लॅटची त्याने परस्पर विक्री केली होती. अशा प्रकारे शैलेशने गुंतवणुकीच्या नावाने त्यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली हाती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विकासक शैलेश रावल याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page