सूनेच्या बहिणीची फसवणुक करणार्या सासर्याविरुद्ध गुन्हा दाखल
फ्लॅटसाठी घेतलेल्या 44 लाखांचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सूनेच्या बहिणीची सुमारे 44 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी रविंद्र शंकर मोहिरे या 68 वर्षांच्या वयोवृद्ध सासर्याविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा रविंद्र मोहिरे याच्यावर आरोप असून यापूर्वी त्याच्याविरुद्ध चेक बाऊन्सिंगचा एक दावा वांद्रे येथील लोकल कोर्टात दाखल आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून आरोपी वयोवृद्धाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
भक्ती अजीत रुमडे ऊर्फ भक्ती राज परुळेकर ही महिला माहीम येथे राहते. तिचे पती राज आनंद परुळेकर यांचा सिंधुदुर्ग येथे बांधकामाचा व्यवसाय आहे तर त्यांचे स्वतचे प्रभादेवी येथे एक दुकान आहे. तिची बहिण पूजा ऋतुराज मोहिरे हिचे सासरे रविंद्र शंकर मोहिरे हे माहीम येथील दिलीप गुप्ते रोड, सहकार आशियाना सहकारी सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक आठमध्ये राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी कुणबी सहकारी बँकेतून कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी त्यांचे राहते फ्लॅट तारण म्हणून ठेवले होते. मात्र कर्जाची परतफेड करता येत नसल्याने बँकेने त्यांच्या फ्लॅटवर जप्तीची कारवाई सुरु केली होती. त्यामुळे त्यांनी ते फ्लॅट विक्रीसाठी काढला होता.
ही माहिती भक्तीला समजताच तिने त्यांना संपर्क साधून त्यांचा फ्लॅट विकत घेण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा सव्वाकोटी रुपयांमध्ये सौदा ठरला होता. याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांच्यात मेमोरंडम ऑफ म्युचअल अंडरस्टॅडिंग फॉर सेल डिड झाला होता. ठरल्याप्रमाणे तिने रविंद्र मोहिरे यांना 44 लाख रुपये दिले होते. या रक्कमेतून त्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली होती. त्यानंतर तिने त्यांना अठरा लाखांचा डीडी देण्यासाठी तयार ठेवला होता, मात्र रविंद्र मोहिरे यांनी अचानक तिचा फोन घेणे बंद केले होते. विचारणा केल्यानंतर ते उडवाउडवीचे उत्तरे देत होते. त्यामुळे भक्तीने त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती.
काही दिवसांनी दोन्ही कुटुंबियांमध्ये एक बैठक झाली होती. त्यात रविंद्रने फ्लॅट खरेदी-विक्रीचा करार रद्द करताना भक्ती रुमडे हिला फ्लॅटसाठी घेतलेले 44 लाख रुपये तसेच या संपूर्ण घटनेने तिला झालेल्या मानसिक त्रासाबाबत अतिरिक्त बारा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. यावेळी दोन्ही कुटुंबातील सदस्य तिथे उपस्थित होते. मे 2025 रोजी त्यांच्यात तसा करार झाला होता. त्यानंतर रविंद्रने भक्तीला 44 लाख आणि 12 लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते. ते धनादेश तिने तिच्या बँकेत जमा केले होते,
मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने दोन्ही धनादेश बाऊंन्स झाले होते. त्यामुळे तिने रविंद्र मोहिरे यांच्याविरुद्ध वांद्रे येथील लोकल कोर्टात चेक बाऊन्सप्रकरणी दावा केला होता. वारंवार विचारणा करुनही रविंद्रने तिला पैसे दिले नाही. विविध कारण सांगून तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने रविंद्र मोहिरे याच्याविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.