फ्लॅट गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची 7.61 कोटीची फसवणुक
बांधकाम कंपनीच्या दोन पार्टनरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 जानेवारी 2026
मुंबई, – बंगला विक्रीतून आलेल्या पैशांतून फ्लॅटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यावसायिकाची त्याच्याच मित्राने दोन विकासकाच्या मदतीने 7 कोटी 61 लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात आश्विनकुमार क्षीरसागर, उदय कृष्णराव परब आणि कृष्णा उदय परब अशी या तिघांचा समावेश असून यातील परब हे अष्टविनायक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे पार्टनर असल्याचे सांगण्यात आले. या तिघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.
67 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार पुरुषोत्तम वासुमल गगवानी हे अंधेरीतील लोखंडवाला, समर्थनगर परिसरात राहतात. 22 वर्षापूर्वी त्यांनी सी अॅण्ड सन प्रॉपर्टीज नावाची एक कंपनी सुरु केली होती. या कंपनीत त्यांच्यासह त्यांची पत्नी ज्योती आणि मुलगा पुनित हे संचालक म्हणून काम पाहत होते. 2004 साली त्यांनी कंपनीच्या नावाने विलेपार्ले येथे एक बंगला घेतला होता. आश्विनकुमार हा त्यांच्या परिचित असून ते दोघेही एकमेकांना गेल्या 28 वर्षांपासून ओळखतात. त्यांच्यात कौटुंबिक संंबंध होते. नऊ वर्षांनी त्यांनी त्यांच्या मालकीच्या बंगल्याची विक्री केली होती. त्यात त्यांना आश्विनकुमारने मदत केली होती. या बंगल्याच्या विक्रीतून त्यांना अकरा कोटी रुपये मिळाले होते. या पैशांतून त्यांना रुणवाल प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेडच्या अंधेरीतील ओशिवरा, इन्फिनिटी मॉलजवळील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, रुणवाल एलिगेंट या निर्माणधीन इमारतीमधील फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती.
याच दरम्यान आश्विनकुमारने त्यांना अष्टविनायक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सची माहिती दिली होती. त्यांच्यामार्फत रुणवाल एलिगेंटमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल असे सांगितले. त्यांना फाईव्ह बीएचके फ्लॅट 9 कोटी 15 लाखांना मिळणार होता, मात्र तोच फ्लॅट त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत खरेदी केल्यास त्यांना फक्त 7 कोटी 61 लाख रुपये भरावे लागणार आहे. त्यात त्यांना फ्लॅट खरेदी-विक्रीत 1 कोटी 54 लाखांचा फायदा होणार होता. त्यामुळे त्यांनी अष्टविनायक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्समार्फत फ्लॅट खरेदीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी कंपनीचे पार्टनर उदय परब आणि कृष्णा परब यांना 7 कोटी 61 लाखांचे पेमेंट केले होते.
काही दिवसांनी त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात त्यांना रुणवाल एलिगेंट अपार्टमेंटमध्ये 3840 स्क्वेअर फिटचा विथ फोर पार्किंगचा देण्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच अष्टविनायक कंपनीकडून त्यांना 7 कोटी 61 लाखांचे पेमेंट मिळाल्याची पावती देण्यात आली होती. 2018 साली त्यांना रुणवाल एलिगेंट अपार्टमेंटमध्ये बुकींग केलेल्या फ्लॅटचे पजेशन देण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन त्यांच्या फ्लॅटविषयी चौकशी केली होती, यावेळी त्यांना त्यांच्या फ्लॅटची पूर्ण रक्कम भरण्यात आली नाही, त्यामुळे त्यांना फ्लॅटचा पजेशन मिळणार नाही असे सांगण्यात आले.
याबाबत त्यांनी आश्विनकुमारकडे विचारणा केली असता त्याने त्यांना अष्टविनायक कंपनीकडून लवकरच उर्वरित पेमेंट जमा केले जाणार असून त्यांना फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले. मात्र त्याने त्याचे आश्वान पाळले नाही. विविध कारण सांगून तो त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. हा व्यवहार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी केली होती. यावेळी आश्विनकुमारने त्यांना अष्टविनायक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या नावाने तीन धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत टाकण्यास मनाई केली होती.
आश्विनकुमार, उदय आणि कृष्णा परब यांच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पत्नीने प्रचंड टेंशन घेतले होते. त्यातच तिचा हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले होते. चार वर्षांत त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले 7 कोटी 61 लाख रुपये परत केले नव्हते. त्यामुळे त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आश्विनकुमार क्षीरसागर, उदय परब आणि कृष्णा परब यांच्याविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना लवकरच समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.