खरेदी केलेल्या फ्लॅटची विक्री करुन डॉक्टर महिलेची फसवणुक
सत्रा प्रॉपटीच्या दोन मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – आठ वर्षांपूर्वी वांद्रे येथील निर्माणधीन इमारतीमधील फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहारासाठी एक कोटी रुपये घेऊन खरेदी केलेल्या फ्लॅटची परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन सत्रा प्रॉपटीच्या मालकांनी एका डॉक्टर महिलेची फसवणुक केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रफुल्ल सत्रा आणि ऋषभ सत्रा या दोघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार असून त्यांना चोकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.
अस्मिता अजीत सारंग या व्यवसायाने डॉक्टर असून सध्या ती त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील सरदार वल्लभभाई पटेल रोड परिसरात राहतात. तिला एका नवीन फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. जानेवारी 2018 साली तिला सत्रा प्रॉपटीच्या वांद्रे येथील एका निर्माणधीन बांधकाम इमारतीविषयी माहिती समजली होती. चौकशी केल्यानंतर या कंपनीकडून वांद्रे येथील के सी मार्ग, रंगशारदाजवळ 81 ऑरिएट या इमारतीचे प्रोजेक्ट सुरु असल्याचे समजले होते. या साईटची पाहणी केल्यानंतर तिने तिथे एक फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता.
याच दरम्यान तिने प्रफुल्ल सत्रा आणि ऋषण सत्रा यांची भेट घेतली होती. फ्लॅटविषयी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी तिला त्यांच्या प्रोजेक्टमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याची ऑफर दिली होती. याच फ्लॅटसाठी तिने त्यांना एक कोटी रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात एक एमओयू बनविण्यात आला होता. त्यात तिला 81 ऑरिएट इमारतीमध्ये 2301 क्रमांकाचा फ्लॅट अॅलोट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. तिने खरेदी केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन या दोघांनी तिची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच तिने त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी तिला पैसे दिले नाही किंवा दुसर्या फ्लॅटचा ताबा दिला नाही. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने त्यांच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शहानिशा केल्यानंतर प्रफुल्ल सत्रा आणि ऋषभ सत्रा या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.