पोलीस निरीक्षकाने बुक केलेल्या फ्लॅटची वरिष्ठ पोलीस अधिकार्याला विक्री
२२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ मे २०२४
मुंबई, – आठ वर्षांपूर्वी बोरिवलीतील गोराई परिसरात बांधकाम सुरु असताना व्हिक्टरी हाईट्स इमारतीमध्ये बुक केलेल्या फ्लॅटची वरिष्ठ पोलीस अधिकार्याला परस्पर विक्री करुन बिल्डरसह त्याच्या दोन सहकार्यांनी एका पोलीस निरीक्षकाची सुमारे २२ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी हिमांशू नरेंद्र शाह, जिग्ना धनश्याम धनक आणि विशाल मुकेश त्रिवेदी या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसर्या इमारतीमध्ये फ्लॅट देतो असे सांगून या तिघांनी फ्लॅटचा ताबा न देता आणि रजिस्ट्रेशन न करता ही फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
किशोर सखाराम आव्हाळे हे भाईंदरच्या नवघर रोड, यशोदा सदन अपार्टमेंटमध्ये राहत असून ते पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग कुरार पोलीस ठाण्यात आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक बोरिवली पोलीस ठाण्यात होती. याच दरम्यान त्यांची व्यवसायाने बिल्डर असलेल्या हिमांशू शहासोबत झाली होती. या ओळखीदरम्यान त्याने त्याचा बोरिवलीतील गोराई परिसरात व्हिक्टरी हाईट्स इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे सांगून तिथे त्यांना एक फ्लॅट खरेदी करण्याची ऑफर दिली होती. टू बीएचके फ्लॅटची किंमत ९० लाख रुपये होती, मात्र त्यांच्यासाठी त्याने ७५ लाख रुपयांमध्ये करार केला होता. सहा महिन्यांत त्यांना फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते, त्याच्यावर विश्वास ठेवून किशोर आव्हाळे यांनी त्याला फ्लॅटसह रजिस्ट्रेशनसाठी २२ लाख २२ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांना व्हिक्टरी हाईट्स इमारतीच्या बी/१२०२ या फ्लॅटचे ऍलोटमेंट लेटर देण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नव्हते.
वारंवार विचारणा करुनही हिमांशू व त्याचे दोन सहकारी जिग्ना धनक आणि विशाल त्रिवेदी हे त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांना त्यांनी बुक केलेल्या फ्लॅटची त्याने एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याला परस्पर विक्री केल्याचे समजले. याबाबत जाब विचारल्यानंतर हिमांशूसह जिग्ना आणि विशाल यांनी त्यांना वेगवेगळे फ्लॅट दाखवून फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन ताबा देण्याचे लेखी आणि तोंडी आश्वासन दिले, मात्र फ्लॅटचा ताबा न देता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हिमांशू शाह, जिग्ना धनक आणि विशाल त्रिवेदी या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणााही अटक झाली नसून लवकरच या तिघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.