मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मे २०२४
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ४० लाखांचा अपहार करुन एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ सल्लागाराची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या बिल्डरला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. बाळकृष्ण अनंत कळंबेकर असे या आरोपी बिल्डरचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सविता धनशाम गाजरे ही महिला सहआरोपी असून तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ते दोघेही दोन वेगवेगळ्या कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजय गोविंदसिंग राजपूत हे गोरेगाव येथे राहत ऊन ते नवी मुंबईतील ऐरोली परिसरात असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीत वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतात. चार वर्षापूर्वी ते त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन फ्लॅटच्या शोधात होते. यावेळी त्यांना सारथी कन्स्ट्रक्शन ऍण्ड लियार्क प्रोजेक्ट कंपनी समृद्धी हाईट्स इमारतीच्या नवीन साईटची माहिती समजली होती. जानेवारी २०२१ रोजी ते गोरगाव येथील उन्नतनगर दोन, पहाडी येथे इमारतीची साईट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी कंपनीचे डेव्हलपर बाळकृष्ण कळंबेकर यांची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्यांना समृद्धी हाईट्स ही अठरा मजल्याची इमारत असून अकरा मजल्यापर्यंत काम झाले होते. २०२२ साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल असे सांगितले. तेरा मजल्यापर्यंत सर्व फ्लॅट बुक झाले असून त्यांना त्याने पंधराव्या मजल्यावर ६४५ चौ. फुटाचा फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर अजय राजपूत यांनी तिथे फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. या फ्लॅटची किंमत एक कोटी चाळीस लाख रुपये होती. त्यामुळे त्यांनी त्याला ४० लाखांचे पेमेंट केले होते. यावेळी त्यांच्यात रजिस्ट्रेशनसह फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर उर्वरित रक्कम टप्याटप्याने देण्याचे ठरले होते. काही दिवसांनी त्यांनी रजिस्ट्रेशनाबाबत विचारणा केली असता त्याने पंधराव्या मजल्याला अद्याप सीसी आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
याच दरम्यान त्यांना त्यांनी बुक केलेल्या फ्लॅट बाळकृष्णची पार्टनर सविता गाजरे हिने परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री करुन त्याचे रजिस्ट्रेशन केल्याचे समजले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर बाळकृष्णने त्यांना तेराव्या मजल्यावर फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबाा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. काही दिवसांनी त्यांना तेराव्या मजल्यावरील दुसरा फ्लॅटही त्यांनी परस्पर विक्री केल्याचे दिसून आले. मनपाच्या रजिस्ट्रेशन साईटवर तपासणी केल्यानंतर तो फ्लॅट अन्य एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे दिसून आले. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बाळकृष्ण कळंबेकर आणि सविता गाजरे यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच बाळकृष्ण कळंबेकर याला पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.