फ्लॅटसाठी घेतलेल्या १.२० कोटीचा अपहार करुन फसवणुक
कापड व्यापार्याच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ जुलै २०२४
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या एक कोटी वीस लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध कापड व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी सचिन शंाताराम सोनावणे याच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरळी कार्यालयात सेल डिडवर स्वाक्षरी न करता सचिन सोनावणे याने पलायन करुन व्यवहार पूर्ण न करता फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
६८ वर्षांचे महेशकुमार राधाकृष्ण नंडाजोग हे कापड व्यापारी असून ते चेंबूर परिसरात राहतात. गेल्या वर्षी सप्टेंबर त्यांचे सचिन सोनावणे याच्या फ्लॅट खरेदी-विक्रीची बोलणी झाली होती. यावेळी त्यांच्यात एक कोटी वीस लाखांमध्ये फ्लॅट खरेदीचा सौदा झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याला फ्लॅटचे संपूर्ण पेमेंट केले होते. जानेवारी २०२४ रोजी त्यांनी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी त्याला सव्वानऊ लाख रुपये दिले होते. त्यांनतर त्यांच्यात वरळीतील रजिस्ट्रेशन कार्यालयात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र ऐन वेळेस सचिन सोनावणे याने सेल डिडवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्यानंतर तो तेथून निघून गेला होता. त्याला फोन केल्यानंतर त्याने सेल डिडवर स्वाक्षरी करणार नाही असे सांगून त्यांना फोनवरुनच शिवीगाळ करुन धमकी दिली होती.
या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या एक कोटी वीस लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे परत करण्यास नकार दिला होता. त्यामुे महेशकुमार यांनी विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सचिन सोनावणे याच्याविरुद्ध ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच सचिनवर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.