फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेसह दोघांची फसवणुक
३६ लाखांना गंडा घालणार्या आरोपी दलालाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – एसआरए फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने एका वयोवृद्ध महिलेसह दोघांची सुमारे सुमारे ३६ लाखांची फसवणुक करणार्या संदीप अरविंद भाटे या आरोपीस दहिसर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याविरुद्ध फसवणुकीच्या अशाच दोन गुन्ह्यांची नोंद असून त्यांच्या अटकेने इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
साठ वर्षांच्या तक्रारदार महिलेची ऑक्टोंबर २०१८ रोजी संदीप भाटेशी ओळख झाली होती. तो म्हाडासह एसआरए फ्लॅट खरेदी-विक्रीच्या दलालीचे काम करतो. त्याने तिला बोरिवलीतील काजूपाडा, साईद्वारका एसआरए इमारतीचा एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट त्याचा भाऊ प्रसन्ना भाटे याच्या मालकीचा असून त्याला हा फ्लॅट एसआरएतर्ंगत मिळाल्याचे सांगितले होते. त्यामुळे या महिलेने तिच्या मुलासोबत फ्लॅटची पाहणी केली होती. फ्लॅट पसंद पडल्यानंतर त्यांच्यात २७ लाख ५० हजारामध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. ठरल्याप्रमाणे तिने त्याला टप्याटप्याने २६ लाख ५० हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीने त्याने तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. विविध कारण सांगून तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिने त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे परत न करता तिची फसवणुक केली होती.
अन्य एका घटनेत विरार येथे राहणार्या तक्रारदार व्यक्तीसोबत संदीपने याच फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्यासाठी त्याने त्याच्याकडून दहा लाख रुपये घेतले, मात्र फ्लॅटचा ताबा न देता त्याने दिलेल्या दहा लाखांचा अपहार करुन त्याने त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच या वयोवृद्ध महिलेसह दोघांनीही दहिसर पोलीस ठाण्यात संदीप भाटेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन त्याचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना त्याला बुधवारी २१ फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. संदीपने त्याच्या भावाच्या फ्लॅटचा या दोघांसह इतर कोणासोबत व्यवहार केला होता का याचा पोलीस तपास करत आहेत.