फ्लॅटच्या नावाने आतेभावाकडून ४७ लाखांचा अपहार

वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन आतेभावासह दोघांविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मार्च २०२४
मुंबई, – मुलुंड येथे स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून एका ६६ वर्षांच्या वयोवृद्धाची त्याच्याच आतेभावासह एजंटने सुमारे ४७ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या वयोवृद्धाच्या तक्रारीवरुन नवघर पोलिसांनी आरोपी आतेभावासह दोघांविरुद्ध भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. श्रीकृष्ण काशिराम सावंत आणि सलीम अब्बास खान अशी या दोघांची नावे असून त्यांनी फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून ही फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

६६ वर्षांचे तक्रारदार वयोवृद्ध प्रदीप दिनकर राणे हे मुलुंड येथे त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत राहतात. ते सेंट्रल रेल्वेत नोकरीस होते. जुलै २०१७ रोजी ते रेल्वेतून सिनिअर टेक्निशियन म्हणून निवृत्त झाले होते. चार वर्षांपूर्वी राणे कुटुंबिय भाईंदर येथे राहत असताना त्यांच्या मोठ्या मुलीला ब्रेनस्ट्रोक झाला होता. तिची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याने ते त्यांच्या पत्नीसोबत तिच्या मुलुंड येथे घरी जात होते. प्रवासात बराच वेळ जात असल्याने त्यांनी मुलुंड येथे एक फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांचा आतेभाऊ श्रीकृष्ण सावंतने त्यांची सलीम खानशी ओळख करुन दिली होती. सलीमने त्यांना मुलुंडच्या गव्हाणपाडा, डेस्टिनी हाईट्स इमारतीमध्ये एक फ्लॅट दाखविला होता.

हा फ्लॅट आवडल्याने त्यांनी तोच फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅटचा ५१ लाख ५२ हजार रुपयांमध्ये सौदा झाला होता. त्यामुळे त्यांनी २०२१ रोजी फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा करार करुन श्रीकृष्ण सावंत व सलीम खान यांना टप्याटप्याने सुमारे ४७ लाख रुपये दिले होते. पेमेंट मिळाल्यानंतर या दोघांनी एका महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर त्यांनी जोपर्यंत फ्लॅटचा ताबा मिळत नाही तोपर्यंत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहण्याचा सल्ला देताना त्यांना भाडे देण्याचे मान्य केले.

दिड वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. याच दरम्यान त्यांनी फ्लॅटच्या कागदपत्रांची शहानिशा केली असता फ्लॅटचे ते सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा ताबा द्या नाहीतर फ्लॅटसाठी घेतलेले पैसे करा अशी सक्त ताकिद दिली होती. मात्र त्यांनी त्यांचे दोन्ही आश्‍वासन पाळले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच प्रदीप राणे यांनी नवघर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांचा आतेभाऊ श्रीकृष्ण सावंत व एजंट सलीम खान यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून ४७ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page