फ्लॅटच्या नावाने बॅकेच्या वरिष्ठ अधिकार्याची फसवणुक
अठरा लाखांच्या फसवणुकप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ मार्च २०२४
मुंबई, – बोरिवलीतील मागाठाणे येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका नामांकित बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याची संचालक असलेल्या पिता-पूत्रांनी फसवणुक केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिन्ही संचालकाविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गौतम शिवशंकर पांडे, मुकेश गौतम पांडे आणि सुनिल गौतम पांडे अशी या तिघांची नावे असून ते तिघेही जेएसपी डेव्हलपर्स कंपनीचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी या अधिकार्यासह इतर काहींची फ्लॅटच्या नावाने फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
नीरजकुमार नबोनाथ झा हे ३८ वर्षांचे तक्रारदार बोरिवलीतील गोराई परिसरात राहतात. ते एका खाजगी बँकेत उपाध्याक्ष म्हणून काम करतात. २०१२ रोजी ते कांदिवली येथे राहत असताना त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन फ्लॅटच्या शोधात होते. यावेळी त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचार्याने त्यांना बोरिवलीतील देवीपाडा, मागाठाणे परिसरात पांडे कुटुंबियांच्या जेएसपी डेव्हलपर्स कंपनीकडून एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी बांधकाम साईटची पाहणी करुन गौतम पांडे यांची भेट घेतली होती. यावेळी गौतमसोबत त्यांचे दोन्ही मुले मुकेश आणि सुनिल हेदेखील उपस्थित होते. या तिघांनी त्यांना त्यांच्या प्रोजेक्टची माहिती दिली होती. या चर्चेनंतर त्यांनी तिथे ७६ लाख रुपयांचा एक फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी त्यांना अठरा लाख रुपये दिले होते. पेमेंट मिळाल्यानंतर पांडे कुटुंबियांनी त्यांना फ्लॅटचे अलोटमेंट लेटर दिले होते. यावेळी त्यांनी त्यांना तीन वर्षांत बांधकाम पूर्ण करुन फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते.
जुलै २०१९ रोजी त्यांना गौतम पांडेने त्याचा प्रोजेक्ट दुसर्या कंपनीला विक्री केल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना त्यांचा फ्लॅट मिळणार असल्याचे सांगितले. मात्र तीन वर्ष उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. ते तिघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. अलोटमेंट लेटरप्रमाणे फ्लॅटचा ताबा न देता तिघांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या अठरा लाख रुपयांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गौतम पांडे, मुकेश पांडे आणि सुनिल पांडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.