मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – फ्लॅटसाठी घेतलेल्या दहा लाखांचा अपहार करुन एका व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. लता यशवंत परकाळे, सुमेर सिंग आणि जयप्रकाश केशव जाधव अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेश छगन लोकरे हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द परिसरात राहतात. जयप्रकाश जाधव हा त्यांचा बालपणीचा मित्र असून त्याने त्यांना मानखुर्द येथील पीएमजीपी, सी व्हयू हाईट्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट असल्याचे सांगितले होते. हा फ्लॅट यशवंत विष्णू परकाळे यांच्या मालकीचा असून त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी फ्लॅटची सुमेर सिंग यांना ५० लाखांना विक्री केली होती. त्यापैकी ४० लाख रुपये त्याने परकाळे कुटुंबियांना दिली. सुमेर हा त्याला ३२ लाख रुपये देणे लागत असल्याने सुमेरने जयप्रकाशसोबत फ्लॅटचा करार केला होता. त्यामुळे फ्लॅटचा ताबा त्याच्याकडे होता. भाड्याने राहण्यासाठी रुमची गरज असल्याने त्यांनी एप्रिल २०२२ रोजी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. काही दिवसांनी जयप्रकाशने तोच फ्लॅट त्यांना खरेदी करण्याचा सल्ला देताना उर्वरित ४० लाख रुपये दिल्यानंतर फ्लॅट त्याच्या नावावर करतो असे सांगितले. त्यासाठी त्याने लता परकाळे आणि सुमेर सिंगशी त्याचे बोलणे करुन दिले होते. त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा सौदा पक्का झाला. त्यानंतर गणेश लोकरे यांनी त्यांना १० लाख ५१ हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचा करार झाला होता.
मात्र फ्लॅट नावावर करण्याबाबत ते तिघेही त्यांना टोलवाटोलवी करत होते. या तिघांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी फ्लॅटचा सौदा रद्द करुन त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी कुर्ला येथील स्थानिक न्यायालयात तिघांविरुद्ध एक याचिका सादर केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मानखुर्द पोलिसांनी लता परकाळे, सुमेर सिंग आणि जयप्रकाश जाधव यांच्याविरुद्ध फ्लॅटसाठी घेतलेल्या दहा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.