फ्लॅटसह कार्यालय व पार्किंगसाठी घेतलेल्या ४.३१ कोटीचा अपहार

बिल्डरविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जुलै २०२४
मुंबई, – एकाच इमारतीमध्ये फ्लॅटसह कार्यालय आणि तीन पार्किंगसाठी घेतलेल्या ४ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार करुन एका कायदेशीर सल्लागार व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिक्षीत रियलटर्सचे मालक आणि बिल्डर शिरीष गिरीश दिक्षीत याच्याविरुद्ध माटुंगा पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच शिरीष दिक्षीतची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

संतोष बाबाजी म्हादे हे शिवडी परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. फेब्रुवारी २००९ साली ते त्यांच्या व्यवसायासाठी तसेच राहण्यासाठी दादर परिसरात जागा पाहत होते. यावेळी त्यांना त्यांच्या परिचित मित्राने दिक्षीत रियलटीच्या शिरीष दिक्षीतशी ओळख करुन दिली होती. या ओळखीत शिरीषने त्यांच्या कंपनीचे दोन ते तीन बांधकाम साईट सुरु असून त्यापैकी दादरच्या हनुमान चौक, टिळक रोडच्या सोहनाज ही जुनी इमारत तोडून तिथे पुर्नविकासाचे काम सुरु करणार असल्याचे सांगितले. अठरा मजल्याची ही इमारत असून त्यात काही व्यावसायिक कार्यालय असतील. तीन वर्षांत या इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांनी त्याच इमारतीमध्ये फ्लॅट आणि व्यवसायासाठी कार्यालय घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा विश्‍वास बसावाम्हणून शिरीषने त्यांना संपूर्ण इमारतीचा प्रोजेक्टसह प्लान दाखविला होता. त्यामुळे संतोष म्हादे यांनी तिथे एक फ्लॅट, कार्यालय घेण्याचे ठरविले होते. यावेळी शिरीषने त्यांना सहाव्या मजल्यावर ३२५२ चौ फुटाचे एक कार्यालय तर बाराव्या मजल्यावर ११९० फुटाचा फ्लॅट तसेच तीन पार्किंग देण्याचे आश्‍वासन दिले होते.

कायदेशीर करार झाल्यानंतर फेब्रुवारी २ फेब्रुवारी ते २७ एप्रिल २००९ या कालावधीत त्यांनी त्याला ४ कोटी ३१ लाख ३६ हजार ९९० रुपयांचे पेमेंट केले होते. ते पेमेंट धनादेशाद्वारे त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते. तीन वर्षांत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल आणि त्यांना फ्लॅट, कार्यालय आणि पार्किंगचा ताबा मिळेल असे सांगण्यात आले होते, मात्र काही परवानग्या आणि तांत्रिक अडचणीमुळे इमारतीचे बांधकाम २०१५ पर्यंत पूर्ण झाले नव्हते. २०२१ पर्यंत जुन्या रहिवाशांसह गुंतवणुकदारांना वेळेत घर आणि भाडे मिळत नसल्याने त्यांनी शिरीष दिक्षीतविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात एक दिवाणी दावा दाखल केला होता. यावेळी शिरीषने न्यायायलासमोर एक कन्सेंट टर्म लिहून दिले होते. त्यात तो किती लोकांना पैसे देणे लागतो याची माहिती होती. ही लिस्ट पाहिल्यानंतर त्यात संतोष म्हादे यांच्या नावाचा कुठेच उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी त्याने त्यांना आगामी दोन वर्षांत संपूर्ण देणीसह त्यांना दुसर्‍या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट, कार्यालय आणि तीन पार्किंग देण्याचे मान्य केले. मात्र त्याने त्याचे आश्‍वासन पाळले नव्हते. या घटनेनंतर त्यांनी शिरीषविरुद्ध माटुंगा पोलिसांनी लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शिरीक्ष दिक्षीतविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page