मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ मे २०२४
मुंबई, – फॉरेन एक्सचेंज गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे साडेनऊ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे.
६० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार परिमल रमनलाल त्रिवेदी हे विलेपार्ले येथील अन्सारी रोड, त्रिवेदी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना अभय नावाच्या एका व्यक्तीने फोन केला होता. त्याने तो सांताक्रुज येथील वाकोला परिसरात असलेल्या पारसनाथ कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला असून या कंपनीचे मुख्य कार्यालय युकेला आहे. त्याने त्यांना फॉरेन एक्सचेंजमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना नक्कीच चांगला परवाता मिळेल असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्याचा वरिष्ठ अधिकारी नवीन जैन याच्याशी बोलणे करुन दिले होते. त्यानेही त्यांना गुंतवणुकीवर हमखास चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी गुंतवणुकीचा निर्णय घेत त्यांच्या सांगण्यावरुन एक ऍप डाऊनलोड केले होते. या ऍपच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२४ त्यांनी सुमारे साडेनऊ लाखांची गुंतवणुक केली होती.
ऍपवरुन त्यांना गुंतवणुकीवर साडेचौदा लाख युएस डॉलरचा नफा झाल्याचे दिसून येत होते. मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी अभयसह नवीन जैनशी संपर्क साधून ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याबाबत विनंती केली होती. मात्र ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी कंपनीविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना सांताक्रुजसह युके देशात पारसनाथ कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कुठलीही कंपनी नसल्याचे निदर्शनास आले. फॉरेन एक्सचेंज गुंतवणुकीवर चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून या टोळीने त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या आरोपीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.