फॉरेक्स ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाने दोन कोटीची फसवणुक
३३ गुंतवणुकदारांना गंडा घालणार्या पती-पत्नीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० जानेवारी २०२५
मुंबई, – फॉरेक्स ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाने अनेक गुंतवणुकदारांची सुमारे दोन कोटीची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका पती-पत्नीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. जाकीर नसीम खान आणि आयेशा जाकीर खान अशी या पती-पत्नीची नावे आहेत. फसवणुकीनंतर ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी शिवाजीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत ३३ गुंतवणुकदार पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले असून या दोघांनी त्यांची दोन कोटी नऊ लाखांची फसवणुक केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले. फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातील तक्रारदार गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात. ते पत्रकार असून त्यांचे एक खाजगी यूट्यूब चॅनेल आहे. ऑक्टोंबर २०२३ रोजी त्यांच्या एका मित्राने त्यांची जाकीरसोबत ओळख करुन दिली होती. या ओळखीत जाकीरने त्याला त्याचा फॉरेक्स ट्रेडिंगचा व्यवसाय असून दुबई त्याच्या कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. अनेकांनी त्याच्या कंपनीत गुंतवणुक केली आहे. ही रक्कम तो दुबईत पाठवतो आणि दुबईतील फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करतो. हा संपूर्ण व्यवहार कायदेशीर असून त्याचा अनेकांना चांगला फायदा झाला होता. त्यामुळे गोवंडी परिसरातच त्याच्या अनेक परिचिताने त्याच्या कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली आहे. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे गुंतवणुकदाराची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्याच्या बोलण्यावर त्याला विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनीही त्याच्या कंपनीमार्फत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्यासह त्याच्या पत्नी आयेशाला गुंतवणुकीसाठी दहा लाख रुपये दिले होते.
ही रक्कम दिल्यानतर त्याच्या नावाने गुंतवणुक केल्याचा एक ऍप देण्यात आले होते. या ऍपची पाहणी केल्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे दिसून येत होते. ऑक्टोंबर २०२४ त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी काही रक्कम काढण्यासाठी विनंती अर्ज केला होता. मात्र टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याचे सांगून त्यांना पैसे मिळाले नाही. नोव्हेंबर महिन्यांत ऍपमधील सर्व डाटा डिलीट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत जाकीरकडे विचारणा केल्यानंतर त्याने त्याच्याकडे सर्वांचे डाटा असल्याचे सांगितले. काही दिवसांनी जाकीरने त्यांचे कॉल घेणे बंद कले होते. गुंतवणुक रक्कमेवर परतावा मिळणे बंद झाले होते. जाकीर आणि आयेशावर विश्वास ठेवून त्यांनी ऑक्टोंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत तेरा लाख साठ हजार रुपयांची गुंतवणुक केली.
चौकशीदरम्यान त्यांच्यासह त्यांच्याकडे इतर ३२ लोकांनी फॉरेक्स ट्रेडिंगसाठी गुंतवणुक केली होती. या सर्वांनी जाकीर आणि आयेशा यांच्याकडे २ कोटी ९ लाख ६७ हजार २५० रुपयांची गुंतवणुक केली होती. सुरुवातीला सर्वांना परतावा मिळत होता, मात्र नंतर ही रक्कम देणे बंद झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विचारणा सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले, त्यांचे मोबाईल बंद करुन ते दोघेही पती-पत्नी पळून गेल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले होते. फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन या दोघांनी आतापर्यंत ३३ गुंतवणुकदारांची दोन कोटी नऊ लाखांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जाकीर खान आणि आयेशा खान या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.