केनिया महिलांची 66 लाखांची कॅश तोतया पोलिसांनी पळविली
एका आरोपीस बुलेटसह 79 लाख 35 हजाराच्या कॅशसह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जानेवारी 2026
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन कापड व्यापारी असलेल्या केनिया महिलांकडील सुमारे 66 लाखांची कॅश दोन तोतया पोलिसांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना फोर्ट परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली असताना एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. सुरेश रंगनाथ चव्हाण असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील बुलेट बाईक आणि 79 लाख 35 हजार 800 रुपयांची कॅश जप्त केली आहे. त्याचा दुसरा सहकारी पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना मंगळवारी 27 जानेवारीला दुपारी दोन ते तीनच्या सुमारास फोर्ट येथील एम. जी रोड, अलाना सेंटर इमारतीसमोर घडली. सुमय्या मोहम्मद आब्दी ही 26 वर्षांची तरुणी मूळची केनियाच्या नैरोबी, मुरातीना स्ट्रिटची रहिवाशी आहे. तिचा लहान मुलांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी ती पहिल्यांदा भारतात आली होती. त्यांनतर ती 26 जानेवारीला मुंबई शहरात लहान मुलांचे कपडे खरेदीसाठी आली होती. सध्या ती मोहम्मद अली रोडच्या अल इब्राहिम हॉटेलच्या रुम क्रमांक 118 मध्ये राहत होती. मंगळवारी 27 जानेवारीला ती सकाळी दहा वाजता हॉटेलमधून खरेदीसाठी निघाली होती. मोहम्मद अली रोडवर तिने काही शाल खरेदी केले होते. त्यानंतर ती काळबादेवी येथे तिच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेली होती.
तिथेच तिची होडेन, इफ्रा, हालिमा आणि फारकिया या मैत्रिणीची भेट झाली होती. त्यानंतर त्या सर्वजणी शॉपिंगसाठी निघाले होते. त्याच रात्री तिला पुन्हा केनियाला जायचे होते. या चौघींकडे पाचशे रुपयांच्या 13 हजार 290 रुपयांचा नोटा अशा 66 लाख 45 हजार रुपयांची कॅश होती. काही वेळानंतर ते काळबादेवी येथून एम. जी रोड, फोर्ट परिसरात आले होते. दुपारी तीन वाजता एका बाईकवरुन दोन तरुण आले. त्यांनी टॅक्सीचालकाला ते दोघेही पोलीस असल्याचे सांगितले. काही वेळानंतर त्यांनी सुमय्या आब्दीसह तिच्या मैत्रिणीची चौकशी सुरु केली. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी करायची आहे असे सांगून त्यांनी त्यांच्याकडील बॅग घेतली होती.
काही कळण्यापूर्वीच ते दोघेही बॅग घेऊन तेथून पळून गेले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोघेही बाईकवरुन पळून जाण्यात यशस्वी झाले होते. काही वेळानंतर त्यांचा टॅक्सीचा चालकही तेथून पळून गेला. या प्रकारानंतर त्यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी सुमय्या आब्दी हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या दोन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दिवसाढवळ्या विदेशी महिलांकडील 66 लाख रुपयांची कॅश दोन तोतया पोलिसांनी पळवून नेल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पळून गेलेल्या तोतया पोलिसांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सुरेश चव्हाण या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच त्याच्या इतर एका सहकार्याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सुरेश हा मूळचा जालना, बदनापूरचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील बाईक आणि 79 लाख 35 हजार 800 रुपयांची कॅश जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त प्रविण मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश साबळे, पोलीस निरीक्षक फरीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप मोरे, सुरज देवरे, पोलीस हवालदार चव्हाण, घाग, साळुंके, पवार, पाटील, गावडे, पोलीस शिपाई हेमाडे यांनी केली.