मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ डिसेंबर २०२४
मुंबई, – गुन्हा मागे घेण्यासाठी होम ट्यूशन घेणार्या एका ४५ वर्षांच्या शिक्षिकेला ६० ते ७० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हेमल अशोक शहा, धरा दिपेश शहा आणि आणि दिपेश शहा अशी या तिघांची नावे आहेत. हा गुन्हा फोर्ट परिसरात घडल्याने त्याचा तपास माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
४५ वर्षांची तक्रारदार महिला ही फोर्ट परिसरात राहत असून ती तिच्या घरीच ट्यूशन घेते. हेमल हा तिचा परिचित असून त्यांची चांगली मैत्री आहे. ते दोघेही सोशल मिडीयावरुन एकमेकांच्या संपर्कात होते. २० मे २०२४ रोजी ते दोघेही व्हॉटअप असताना त्याने तिला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्याने व्हिडीओ कॉल सुरु असताना काही अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरमयान धरा शहाने तिच्याविरुद्ध एका प्रकरणात पोलिसांत एक बोगस तक्रार केली होती. त्यामुळे तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
२४ डिसेंबर २०२४ रोजी दिपेश शहाने तक्रारदार महिलेच्या वडिलांना कॉल केला होता. यावेळी त्याने त्यांच्याकडे संबंधित प्रकरण मिटविण्यासाठी तसेच गुन्हा मागे घेण्यासाठी साठ ते सत्तर लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर तिला महाराष्ट्रात राहू देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यामुळे या महिलेने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हेमल शहा, धरा शहा आणि दिपेश शहा या तिघांविरुद्ध विनयभंगासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या तिघांची संबंधित पोलिसांकडून चौकशी होणार आहे.