काठीने केलेल्या मारहाणीत पोलीस हवालदाराला गंभीर दुखापत

भावांच्या भांडणात मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात घडलेला प्रकार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मे २०२४
मुंबई, – काठीने केलेल्या मारहाणीत विश्‍वास शंकर आमटे या पोलीस हवालदाराला गंभीर दुखापत झाली. डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्या डोक्याला तीन टाके लागले आहे. याप्रकरणी कर्तव्य बजाविणार्‍या पोलीस हवालदाराला मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विनय विनोद दवे या आरोपीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

विश्‍वास आमटे हे आझाद मैदान वाहतूक पोलीस चौकीत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री ते त्यांचे सहकारी पोलीस हवालदार सचिन चव्हाण यांच्यासोबत कार्यालयीन काम करत होते. यावेळी त्यांच्या चौकीसमोरच विनय आणि विशाल दवे या दोन बंधूंमध्ये आर्थिक वादातून भांडण सुरु होते. या भांडणानंतर विनयने विशालला काठीने मारहाण करत होता. स्वतचा जीव वाचविण्यासाठी विशाल हा वाहतूक पोलीस चौकीत आला होता. यावेळी विनयला पोलिसांनी शांत राहण्यास सांगितले. मात्र तो कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. भांडणात मध्यस्थी करणार्‍या पोलीस हवालदार विश्‍वास आमटे यांनाच त्याने काठीने जोरात मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्यात दुखापत झाली आणि रक्तस्त्राव होऊ लागला. तिथे उपस्थित लोकांना विनयने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी जखमी अवस्थेत असलेल्या विश्‍वास आमटेसह त्यांचे सहकारी सचिन चव्हाण यांनी बळाचा वापर करुन विनयला चौकशीसाठी ताब्यात घेतले. जखमी झालेल्या विश्‍वास आणि विनयला नंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे दोघांवर प्राथमिक औषधोपचार करुन सोडून देण्यात आले. भांडणात विनयच्या हाताला विशालने तिक्ष्ण हत्याराने वार केल्याने तो जखमी झाला होता तर विश्‍वास यांच्या डोक्याला तीन टाके लागले होते. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनयविरुद्ध मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर विनयला पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page