अश्लील फोटो व्हायरल करणार्या माजी प्रियकराला अटक
लग्नास नकार दिला म्हणून अश्लील फोटो व्हायरल केल्याची कबुली
राजू परुळेकर
२१ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – प्रेमसंबंध तोडून दुसर्या तरुणाशी विवाह करणार्या तरुणीचे अश्लील फोटोसह व्हिडीओ तिच्या भावी पतीला पाठवून तिची बदनामी केल्याप्रकरणी जावेद अन्सारी ऊर्फ मोहम्मद जाकीर अन्सारी याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. लग्नास नकार दिला म्हणून रागाच्या भरात त्याने तिचे अश्लील फोटो व्हायरल करुन तिची बदनामी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला पोलीस उपनिरीक्षक नितीन सवने यांनी दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार तरुणी ही गोरेगाव परिसरात राहत असून तिची जावेद हा मित्र आहे. ते दोघेही एकमेकांच्या परिचित असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. या मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान त्याने तिच्या संमतीविना तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले होते. काही दिवसांनंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन खटके उडू लागले आणि तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. याच दरम्यान तिच्या कुटुंबियांनी तिचे लग्न ठरविले होते. ही माहिती जावेदला समजताच त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने त्याच्याशी लग्न केले नाहीतर तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ पाठवून तिची बदनामीची धमकी दिली होती. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. ती तिच्या निर्णयावर ठाम असल्याने रागाच्या भरात त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तिच्या पतीला पाठवून तिची बदनामीचा प्रयत्न केला होता. हा प्रकार तिच्या भावी पतीकडून समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे पालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर तिने दिडोंशी पोलीस ठाण्यात जावेदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ७७, ३५१ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ६७, ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलीस उपनिरीक्षक नितीन सवणे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना जावेद हा सुरभी हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सवने, पोलीस हवालदार सचिन कांबळे, गणेश शिंदे, अमीत वायंगणकर, पोलीस शिपाई शैलेंद्र भंडारे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून जावेदला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीला अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन सवने, पोलीस हवालदार सचिन कांबळे, गणेश शिंदे, अमीत वायंगणकर, पोलीस शिपाई शैलेंद्र भंडारे यांचे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी कौतुक केले होते.