स्फोटकासह बॉम्ब असल्याच्या चार बोगस मॅसेजने खळबळ
सहार-विमानतळ पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – स्फोटकांसह बॉम्ब असल्याच्या चार बोगस मॅसेजने गुरुवारी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. सर्व विमानाची तपासणी केल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहार आणि विमानतळ पोलिसांनी चार स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तीन दिवसांपूर्वी नवी मुंबई पोलिसांना एअर इंडियाच्या न्यूयॉर्कसह इतर दोन विमानात बॉम्ब असल्याचा मॅसेज आला होता. मात्र या तिन्ही विमानाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एका अल्पवयीनम मुलासह दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत या मुलाने संबंधित मॅसेज पाठविल्याचे उघडकीस आले होते. या घटनेला काही तास उलटत नाहीतर तोवर गुरुवारी विमानात स्फोटकेसह बॉम्ब असल्याच्या चार निनावी मॅसेजमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र ते चारही मॅसेज बोगस असल्याचे विमानाची तपासणीनंतर उघडकीस आले.
स्वप्नील तुशार पटेल हे कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहतात. सध्या ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामाला आहेत. गुरुवारी रात्री बारा वाजता ते कामावर असताना त्यांच्या कंपनीच्या ट्विटर हँडलवर एक मॅसेज आला होता. त्यात विमानात स्फोटके असून ते स्फोटके मुंबईतून दिल्लीला निघाले आहे. या स्फोटात अनेक लोक मारले जातील असे नमूद केले होते. मुंबईहून दिल्लीत जाणार्या विमानात बॉम्ब असल्याच्या मॅसेजनंतर या विमानाची कसून तपासणी करण्यात आली, मात्र त्यात काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. अशा प्रकारे अज्ञात व्यक्तीने विमानातील प्रवाशी, एअरपोर्ट परिसरातील नागरिक आणि इतर प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या धमकीनंतर गुरुवारी दुपारी सव्वाच्या सुमारास इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याचा एक मेल आला होता. मात्र या विमानाची तपासणी केल्यानंतर विमानात काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सहार पोलिसांनी अन्य एका व्यक्तीविरुद्ध दुसर्या गुन्ह्यांची नोंद केली होती.
अशाच प्रकारे विमानतळ पोलिसांनी गुरुवारी दिवसभरात दोन स्वतंत्र बॉम्बच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते. त्यातील एका ट्विटर अकाऊंटवरुन दरभंगा-मुंबई आणि लेह-दिल्लीच्या स्पायजेट विमानात बॉम्ब आणि स्फोटके असल्याचा मॅसेज पाठविला होता. या मॅसेजनंतर या दोन्ही विमानाला विमानतळावर थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले होते. संपूर्ण विमानाची तपासणी केल्यानंतर त्यात काहीही सापडले नाही. त्यानंतर संबंधित विमानाला उड्डानाची परवानगी देण्यात आली होती. त्यापूर्वी अन्य एका ट्विटर हॅन्डलवरुन विमानात स्फोटके असल्याचा एक मॅसेज प्राप्त झाला होता. मात्र बॉम्ब असल्याचा तो मॅसेजही बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे विमानतळ आणि सहार पोलिसांनी एकाच दिवशी चार स्वतंत्र स्फोटकासह बॉम्ब असल्याचा बोगस मॅसेज पाठवून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले होते.