शहरात चार घरफोडीच्या गुन्ह्यांत 21 लाखांची लूट

स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – मुंबई शहरात चार वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांत अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटसह एका किराणा शॉपमध्ये प्रवेश करुन 21 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खार, मालाड, डी. एन नगर आणि शिवाजीनगर पोलिसांनी चार स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

नितीन शिवप्रकाश सियाल हे अंधेरीतील जेव्हीपीडी सर्कलजवळील साईधाम अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्यासह त्यांच्या वडिलांचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी त्यांचे संपूर्ण कुटुंबिय उज्जैनला गेले होते. तेथून त्यांचे आई-वडिल राजस्थानला तर 23 जूनला ते त्यांच्या बहिणीसोबत मुंबईत आले होते. घरी आल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले. घरात कोणी नसल्याने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन 7 लाख 67 हजार रुपयांचे 133 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने चोरी केले होते. त्यानंतर त्यांनी डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती.

दुसरी घटना गोवंडीतील बैंगनवाडीत घडली. या ठिकाणी पिंटू राजेंद्र मौर्या हे राहत असून तो तौकिर अहमद सिद्धीकी यांच्या लेडीज कपडे शिवण्याचा कारखान्यात कामाला आहे. 5 जूनला त्याचे मालक उत्तरप्रदेशातील गाजीपूर येथील गावी गेले होते. 1 जुलैला त्यांच्या मालकाच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन विविध सोन्याचे दागिने आणि पंधरा हजाराची कॅश असा 4 लाख 65 हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर त्याने त्याच्या मालकाला सांगितला. मालकाच्या आदेशानंतर त्याने शिवाजीनगर पोलिसांत घरफोडीची तक्रार केली होती.

मालाड येथील तिसर्‍या घरफोडीच्या गुन्ह्यांत अज्ञात चोरट्याने पाच लाख दहा हजाराचा मुद्देमाल चोरी केला. विनिता अरुण पागे हे ही महिला मालाडच्या गोरसवाडीत राहते. याच ठिकाणी तिचे दोन रुम आहे. 1 जुलैला रात्री जेवण करुन ते दुसर्‍या रुममध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने कपाटातील पाच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच तिने मालाड पोलिसांत तक्रार केली होती.

अंधेरीतील रहिवाशी असलेले देवराज भच्चू पटेल यांचा खार येथे किराणा मालाचे एक शॉप आहे. 2 जुलैला दिवसभरातील जमा झालेली चार लाख पंधरा हजाराची कॅश त्यांचा पार्टनर नाथालाल पटेल यांनी दुकानाच्या कॅश काऊंटरमध्ये ठेवली होती. त्यानंतर ते त्यांच्या घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी ते दुकानात आले असता त्यांना तिथे चोरी झाल्याचे दिसून आले. दुकानाच्या टॉयलेटच्या खिडकीतून प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करुन कॅश काऊंटरमधील ही कॅश चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी खार पोलिसांत घरफोडीची तक्रार केली होती.

या चारही घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page